रायगड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। अविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूर यांच्या तर्फे दरवर्षी दिला जाणारा ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कार’ यंदा म्हसळा न्यू इंग्लिश स्कूलचे ज्येष्ठ कर्मचारी संतोष जंगम यांना प्रदान करण्यात आला. पोलादपूर येथे मोठ्या उत्साहात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
संतोष जंगम हे गेल्या ३२ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, त्यापैकी २७ वर्षे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे शिपाई म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. आपल्या कार्यनिष्ठा, वेळपालन आणि शाळेच्या प्रगतीसाठी असलेल्या समर्पणामुळे त्यांनी सर्वांचे मन जिंकले आहे. त्यांच्या सेवाभावाची दखल घेत, आतापर्यंत त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. २०१७ मध्ये जैन संघ व सर्वज्ञ आधार फाऊंडेशनचा ‘उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार’, २०२० मध्ये ‘कोकणरत्न पुरस्कार’ आणि २०२१ मध्ये रायगड जिल्हा परिषदेचा ‘शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार’ असा गौरव त्यांना मिळाला आहे.
यंदा अविष्कार फाऊंडेशनने त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याचा सन्मान करत ‘गुणवंत कर्मचारी पुरस्कार’ प्रदान केला. या प्रसंगी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष सोपान चांदे, हिरवळ प्रतिष्ठानचे किशोर धारिया, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, उद्योगपती संजय जाधव, किशोर मोहिते आणि माजी उपसभापती शैलेश सलागरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके