रायगड, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।अलिबाग–वडखळ मार्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासी, वाहनचालक आणि पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाने आज (दि.७) पेझारी चेकपोस्ट येथे रास्ता रोको आंदोलन केले. प्रशासनाकडून वारंवार निवेदन दिल्यानंतरही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यामुळे शेकाप आक्रमक भूमिकेत उतरला.
सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी केले. त्यांच्या सोबत शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा सहचिटणीस अॅड. गौतम पाटील, तालुका चिटणीस सुरेश घरत, नरेश म्हात्रे, विजय गीदि, विलास म्हात्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चित्रलेखा पाटील यांनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका करत म्हटले की, “गणपतीपूर्वी तात्पुरती डागडुगी केली असली तरी आज पुन्हा रस्ता खड्डेमय झाला आहे. वारंवार निवेदन देऊनही दखल घेतली जात नाही, त्यामुळे रस्त्यावर उतरावे लागत आहे.” त्यांनी दिवाळीपूर्वी दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, निधी आणि खर्चाचा तपशील जाहीर करावा, या मागण्या लेखी आश्वासनात समाविष्ट करण्याची अट घातली.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या बस, अँब्युलन्स आदी वाहनांना प्राधान्य देत वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली. सुमारे दीड तास चाललेल्या या आंदोलनात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन दिवाळीपूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, दिवाळीपर्यंत काम न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेकापकडून देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके