पुणे, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ अंतर्गत पदवीधर तसेच शिक्षक मतदार नोंदणी करण्यास सुरुवात झाली असून शिरूर तालुक्यातील पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता शिक्षक मतदारांसाठी फॉर्म क्र. १९ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मतदार हा १ नोव्हेंबर २०२५ च्या लगत पूर्वीच्या सहा वर्षांतील किमान तीन वर्ष माध्यमिक शाळेच्या दर्जापेक्षा कमी नसलेल्या अशा राज्यातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत अध्यापन केलेल्या प्रत्येक शिक्षक मतदार यादीत नाव नोंदविण्यास पात्र आहे.
पदवीधर मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याकरिता फॉर्म क्र. १८ उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भारतीय नागरिक असलेली प्रत्येक व्यक्ती, संबंधित मतदारसंघात सामान्यतः रहिवासी असलेली आणि १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्ष भारतातील पात्र विद्यापीठाची पदवी अथवा समकक्ष अर्हता प्राप्त केलेली प्रत्येक व्यक्ती पदवीधर मतदार म्हणून नोंदणीस पात्र आहे. अर्जदाराने अर्जामध्ये खोटी माहिती दिल्यास, लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, १९५० च्या कलम ३१ अन्वये संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अर्जदारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांसह मुदतीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी, संगीता राजापूरकर, आणि पदनिर्देशित अधिकारी (शिक्षक व पदवीधर मतदारसंघ) तथा तहसिलदार, बाळासाहेब म्हस्के यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु