जयपूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)।रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौर्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि रशियामधील सैन्य सहकार्य पुन्हा एकदा गती घेत आहे. भारत आणि रशियाच्या सैन्यांमधील वार्षिक संयुक्त युद्धाभ्यास ‘इंद्रा’ चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 पासून ‘इंद्रा-2025’ युद्धाभ्यासाला सुरुवात झाली आहे, जो पुढील आठवड्यात बुधवार, 15 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होईल.
या औपचारिक उद्घाटन समारंभात, रशियाचे निरीक्षक मेजर जनरल आंद्रे कोजलोव आणि भारतीय सेनेच्या गांडीव विभागाचे कमांडर मेजर जनरल संजय चंद्र कांडपाल, तसेच भारत आणि रशियाच्या लष्करी तुकड्यांचा सहभाग होता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या उद्घाटन सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करून युद्धाभ्यासाची अधिकृत घोषणा केली.
साल 2003 पासून भारत आणि रशिया दरवर्षी संयुक्त लष्करी युद्धाभ्यास ‘इंद्रा’ आयोजित करत आले आहेत. हा युद्धाभ्यास थलसेना, वायुदल आणि नौदल या तिन्ही सैन्य शाखांमध्ये केला जातो. साल 2017 मध्ये दोन्ही देशांनी पहिल्यांदाच त्रि-सेवा इंद्रा युद्धाभ्यास केला होता. परंतु 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे हा युद्धाभ्यास थांबवण्यात आला होता. 2021 मध्ये शेवटचा इंद्रा युद्धाभ्यास झाला होता. आता युक्रेनमधील युद्धात थोडी स्थिरता आल्यानंतर, रशियाने पुन्हा सैन्य सराव सुरू केले आहेत. याच महिन्यात रशियाने बेलारूससोबत ‘झापड’ नावाचा बहुराष्ट्रीय युद्धाभ्यास केला, ज्यामध्ये भारत, चीन, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यासह अनेक देशांच्या सैन्य तुकड्या व निरीक्षक सहभागी झाले होते.
‘इंद्रा’ युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात एकत्रित लढा देणे आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय, सामंजस्य आणि ऑपरेशनल सुसंगतता वाढवणे. आधुनिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सर्वोत्तम तंत्र व धोरणांचा आदानप्रदान करणे. संयुक्त सुरक्षा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी क्षमता विकसित करणे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा सराव दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करेल आणि भारत-रशिया रणनीतिक भागीदारीला बळकट करण्यास मदत करेल. मेजर जनरल संजय चंद्र कांडपाल यांच्या मते, हा युद्धाभ्यास जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी भारत आणि रशियाची बांधिलकी दर्शवतो. ते म्हणाले, “दोन्ही देशांची एकत्रित ताकदच भविष्यात शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग खुला करेल.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode