अमरावती : विदर्भातील कर्तुत्ववान शेतकऱ्यांसाठी दोन प्रतिष्ठित पुरस्कार घोषित
अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। विदर्भातील प्रेरणादायी शेतकरी पुरुष व महिलांच्या कार्याची दखल घेत श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या वतीने ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ आणि नव्याने सुरू करण्यात आलेला ‘स्व. शरद जोशी स्मृती उत्कृष्
विदर्भातील कर्तुत्ववान शेतकरी पुरुष आणि महिलांसाठी प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार घोषित


अमरावती, 7 ऑक्टोबर, (हिं.स.)। विदर्भातील प्रेरणादायी शेतकरी पुरुष व महिलांच्या कार्याची दखल घेत श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीच्या वतीने ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार’ आणि नव्याने सुरू करण्यात आलेला ‘स्व. शरद जोशी स्मृती उत्कृष्ट शेतकरी (पुरुष) पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव (भाऊसाहेब) देशमुख जयंती उत्सवाच्या मुख्य सोहळ्यात सन्मानपूर्वक करण्यात येणार आहे.पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन प्र. देशमुख यांनी माहिती दिली.

हे पुरस्कार विदर्भातील प्रत्यक्ष शेतीत कार्यरत असलेल्या शेतकरी पुरुष व महिलांना दिले जाणार आहेत. मागील वर्षी सुरू झालेला शारदाबाई पवार पुरस्कार यावर्षी देखील दिला जाणार आहे, तर यंदापासून शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उत्कृष्ट शेतकरी (पुरुष) पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह उपाध्यक्ष ॲड. जे. व्ही. पाटील पुसदेकर, केशवराव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य सुरेशराव खोटरे, सुभाषराव बनसोड, सचिव डॉ. वि. गो. ठाकरे तसेच विविध प्राचार्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या वतीने दोन्ही पुरस्कारांसाठी दान निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मा. खा. शरद पवार व मा. ना. नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानण्यात आले.

असे राहणार पुरस्काराचे स्वरूप

शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार:

रोख रक्कम ₹१,११,१११/-

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ

निधी – मा. खा. शरदचंद्र पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)

स्व. शरद जोशी स्मृती उत्कृष्ट शेतकरी (पुरुष) पुरस्कार:

रोख रक्कम ₹१,११,१११/-

स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ

निधी – ना. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, भाजप)

पात्रता व निकष

फक्त विदर्भातील प्रत्यक्ष शेती करणारे महिला व पुरुष शेतकरी पात्र

शेती त्यांच्या किंवा त्यांच्या जोडीदाराच्या नावावर असावी

सेंद्रिय शेती, बीजोत्पादन, प्रक्रिया, निर्यात, यांत्रिकीकरण, गोबर गॅस, ठिबक सिंचन, दुग्धव्यवसाय इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

अन्य शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कृषी मेळावे, स्पर्धा, प्रचार-प्रसारात सहभाग

आवश्यक कागदपत्रे: सातबारा, आठ अ, प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्र

प्रस्ताव सादर करण्याचे ठिकाण व अंतिम तारीख

श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती

अर्जाचा नमुना www.ssacpdkv.org या संकेतस्थळावर उपलब्ध

शेवटची तारीख: २८ ऑक्टोबर २०२५

अर्ज विहित नमुन्यात व सर्व कागदपत्रांसह वेळेत सादर करणे आवश्यक.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande