रत्नागिरी, 7 ऑक्टोबर, (हिं. स.) : स्मार्ट वीज मीटरची जबरदस्ती केली जात आहे. त्या निर्णयाविरोधात जनतेत संतापाची लाट उफाळून आली आहे. त्याविरोधात आज चिपळूणमध्ये काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात जबरदस्ती सहन करणार नाही, असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी दिला.
मोर्चाचे नेतृत्व श्री. जाधव यांनी केले, तर पुढाकार चिपळूण युवासेना तालुकाप्रमुख उमेश खताते यांनी घेतला. मोर्चा महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आले. महावितरणकडून वीजबिल दुप्पट-तिप्पट येऊ लागल्यामुळे जुने मीटर काढून बळजबरीने प्रीपेड मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात जनता संतप्त झाली आहे. याच संतापाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याचे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले.
महावितरण कार्यालयासमोर मोर्चा येताच घोषणाबाजीने परिसर गाजवला. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केले आणि प्रीपेड मीटरचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. यापुढे एकही प्रीपेड मीटर बसवू नये, आधी बसवलेले मीटर तत्काळ काढावे, तसेच जबरदस्ती केली गेल्यास महाविकास आघाडी योग्य तो बंदोबस्त करेल, असा इशारा देण्यात आला.मोर्चात सहभागी जनतेनेही जोरदार पाठिंबा दर्शविला आणि वीज दरवाढ, चुकीची बिले, स्मार्ट मीटरचा फसवा खेळ आणि गलथान कारभार थांबवण्याची मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी