सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व त्यामुळे सीना नदीला आलेल्या पुराने महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर, माढा, करमाळा, मोहोळ, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात नदीकाठावर असलेल्या गावात व शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा करणार्या महावितरणच्या लघुदाब उच्चदाब व रोहित्र पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वीज पुरवठा दि. 22 सप्टेंबरपासून पूर्णतः खंडित होता. बाधित एकूण 95 गावांपैकी 88 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
या गावांना वीज पुरवठा करणार्या 11 केव्ही वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बर्याच ठिकाणी पर्यायी उपकेंद्र व वाहिनी यांच्या साहाय्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. देखील माढा तालुक्यातील वाकाव, कुंभेज, खैराव व सुलतानपुर तसेच मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी व मुंढेवाडी ही गावे दि. 2 ऑक्टोबरपर्यंत अंधारात होती. माढा तालुक्यातील वाकाव कुंभेज, खैराव या गावांना मानेगाव उपकेंद्रातून नवीन 22 पोलची 11 केव्ही वाहिनी उभारून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड