सोलापूर, 7 ऑक्टोबर (हिं.स.)। यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तारीख जाहीर झाली असली तरी व आरआरसी कारवाई होऊन देखील सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांकडे अद्यापही ३३.२६ कोटी रुपये एफआरपी थकली आहे. दिवाळी तोंडावर येऊन देखील आठ महिन्यांनंतरही एफआरपी न मिळाल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच एफआरपी व जाहीर केलेल्या ऊस दराव्यतिरिक्त मागील हंगामात गाळप झालेल्या उसाची दिवाळीसाठी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे ऊसबिले मिळावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
१ ऑक्टोबर ते ३० सप्टेंबर असा साखर हंगामाचा कालावधी गणला जातो. यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. गतवर्षी राज्यात २०० कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. त्यामध्ये ८५५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्या उसाची २४ हजार ७२० कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. तथापि, गतवर्षीचा साखर हंगाम संपला तरी राज्यातील ४८ कारखान्यांकडे अद्यापही २५१ कोटी रुपयांची एफआरपी थकली आहे. राज्यातील १५२ कारखान्यांनीच शंभर टक्के एफआरपी दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड