अमरावती, 8 ऑक्टोबर (हिं.स. अमरावती मॉडेल रेल्वेस्थानक ते राजकमल चौक मार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजचे पुनर्निर्माण करण्याची मागणी खा. डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. त्याची दखल घेत, रेल्वे ओव्हरब्रिज निर्माणकार्याला
रेल्वेमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली आहे. लवकरच या पूलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे.
अमरावती शहराच्या विविध भागांना जोडणारा रेल्वे ओव्हरब्रिज १९६३ मध्ये उभारण्यात आला होता. त्याचे आयुर्मान संपल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शहरवासियांना असुविधेला समोर जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी याठिकाणी उड्डाणपूल निर्माण करण्याची मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यासाठी त्यांनी २५० कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता असल्याचेही रेल्वेमंत्र्यांना लक्षात आणून दिले होते. खा. डॉ. बोंडे यांच्या या मागणीची मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दखल घेत रेल्वे मंत्रालयाद्वारे वा ठिकाणी उड्डाणपूल निर्माणाची प्रक्रिया अंतिम टप्यात आली असल्याचे कळविले आहे. शिवाय, सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यकती प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ना. वैष्णव यांनी म्हटले आहे. येत्या काही दिवसांतच या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होण्याची चिन्हे आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी