नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर (हिं.स.)फुटबॉल ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. यावेळी, तो गोल किंवा ट्रॉफीसाठी नाही तर त्याच्या बँक बॅलन्ससाठी आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार रोनाल्डोची एकूण संपत्ती 1.4 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. ज्यामुळे तो फुटबॉलचा पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू बनला आहे. ब्लूमबर्गने सांगितले की रोनाल्डोची संपत्ती या निर्देशांकात पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आली आहे. या मूल्यांकनामुळे तो जागतिक फुटबॉलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलपटू बनला आहे, त्याने आपला प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे. रोनाल्डोच्या कमाईचा सर्वात मोठा भाग त्याच्या मानधनातून येतो. युरोपमधील त्याचे मानधन मेस्सीच्या मानधना इतकेच होते. पण त्याने 2023 मध्ये सौदी अरेबियाच्या अल नसर क्लबशी करार केला. आणि त्याच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली. या करारात करमुक्त वार्षिक मानधन आणि दशलक्ष अमेरिकन डॉलर्स बोनस, तसेच 30 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स साइनिंग बोनसचा समावेश होता. ब्लूमबर्गच्या मते, २००२ ते २०२३ पर्यंत रोनाल्डोने एकूण ५५० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मानधन मिळवले. रोनाल्डोच्या उत्पन्नाचा दुसरा स्रोत जाहिराती आहेत. नायकेसोबतच्या त्याच्या दहा वर्षांच्या करारामुळे त्याला दरवर्षी अंदाजे १८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळतात. याव्यतिरिक्त, अरमानी आणि कॅस्ट्रॉल सारख्या ब्रँड्ससोबतच्या भागीदारीमुळे त्याच्या एकूण संपत्तीत अंदाजे १७५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची भर पडली आहे. त्याने आपल्या सीआर7 ब्रँड अंतर्गत हॉटेल्स, जिम आणि फॅशनमध्येही व्यवसाय केला आहे. रोनाल्डोकडे लिस्बनजवळील क्विंटा दा मारिन्हा हाय-एंड गोल्फ रिसॉर्टसह अनेक लक्झरी मालमत्ता आहेत. ज्याची किंमत अंदाजे २० दशलक्ष युरो आहे. रोनाल्डोचा दीर्घकाळचा प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत एकूण करमुक्त मानधन अंदाजे ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स मिळवले आहे. २०२३ मध्ये मेस्सी इंटर मियामीमध्ये सामील झाला तेव्हा त्याला २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वार्षिक मानधन मिळण्याची हमी देण्यात आली होती. पण, रोनाल्डोच्या एकूण कमाईत त्याच्या ब्रँड जाहिराती आणि व्यवसायातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात योगदान देते. ज्यामुळे तो कमाईच्या बाबतीत मेस्सीपेक्षा पुढे जाऊ शकला आहे. रोनाल्डोची सोशल मीडियावरही त्याची जागतिक लोकप्रियता दर्शवते. त्याचे इंस्टाग्रामवर ६६० दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तो सर्वाधिक फॉलोअर्स असलेला व्यक्ती बनला आहे. यावरून असे दिसून येते की, त्याचा प्रभाव केवळ फुटबॉलपुरता मर्यादित नाही तर ब्रँड एंडोर्समेंट आणि लोकप्रियतेवरही त्याची मजबूत पकड आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे