बीड, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. यावेळी बीड व शिरूर कासार तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांचे पुनर्वसन, विकास प्रकल्प आणि आगामी स्थानिक निवडणुका या विषयांवर सखोल चर्चा झाली.
बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील भूस्खलनाच्या गंभीर परिस्थितीबाबत डॉ.क्षीरसागर यांनी अजितदादांचे लक्ष वेधले. त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्री अजितदादांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या.हिंगणी खुर्द गावात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीबाबतही चर्चा झाली. या भागातील पंचनामे, मदत व गाव पुनर्वसनाच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी डॉ.क्षीरसागर यांनी केली. तसेच बीड शहरातील डीपी रस्ते प्रकल्पालाही अजितदादा पवार यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच, अन्य रस्त्यांसाठी डीपीसीव्यतिरिक्त राज्य शासनाकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत डॉ.योगेश क्षीरसागर व अजितदादा पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी मार्गदर्शन केले असून पूर्ण ताकदीने निवडणुका लढविल्या जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis