इस्लामाबाद , 8 ऑक्टोबर (हिं.स.)। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सध्या खूपच वाढलेला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दोन्ही देशात युद्धाचे संकेत दिले आहेत. “जर या वेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल,” अशी पोकळ धमकी ख्वाजा आसिफ यांनी भारताला दिली आहे. ख्वाजा आसिफ यांनी याआधीही बऱ्याचदा वादग्रस्त विधाने केली आहेत. भारतीय हवाई दलाबद्दलही त्यांनी गरळ ओकली होती.
पाकिस्तानी न्यूज चॅनलशी बोलताना ख्वाजा आसिफ म्हणाले, “जर तुम्ही इतिहासाकडे पाहिलं, तर हिंदुस्थान केवळ एकदाच एकसंध राज्य होता, ते म्हणजे औरंगजेबाच्या काळात, १८व्या शतकात. भारत कधीच एक देश नव्हता. कधीतरी ५४० रियासती होत्या. आम्ही तर अल्लाहच्या नावावर देश बनवला आहे.”
तसेच त्यांनी असेही म्हटले, “ वरून खालपर्यंत आपल्यात किती भांडणे सुरू आहेत. उत्तर ते दक्षिणेपर्यंत हेच सुरू आहे. या गोष्टींचा प्रभाव पडतो. पुन्हा एकदा युद्धासारखी परिस्थिती बनत असल्याचं मला वाटते. पण यावेळी युद्ध झाले तर अल्लाह आपल्याला आधीपेक्षाही जास्त मोठा विजय मिळवून देईल.” ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच भारतीय वायुसेनेविरोधातही खालच्या पातळीवर टीका केली होती, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी तणाव निर्माण झाला आहे.
पाकिस्तान अनेक वेळा भारताविरोधात कट रचत असतो. त्याने अनेकदा दहशतवादी हल्ल्यांचे षडयंत्र रचले आहे, परंतु भारताने वेळोवेळी त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. या ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांनाही मोठं नुकसान केलं होतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode