कॅनबेरा, ८ ऑक्टोबर, (हिं.स.) अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कमिन्सची पाठीची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही आणि त्याला केवळ सुरुवातीच्या सामन्यातूनच नाही तर संपूर्ण मालिकेतूनही बाहेर पडावे लागू शकते.
कमिन्सच्या स्कॅनमध्ये असे दिसून आले आहे की, त्याच्या दुखापतीत सुधारणा झालेली नाही आहे. पण तो गोलंदाजी पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नाही. परिणामी, २१ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमधून त्याची अनुपस्थिती निश्चित मानली जात आहे.
कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद मिळू शकते. कमिन्स शेवटचा जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ३-० अशा कसोटी मालिकेत खेळला होता. त्यानंतर तो दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतूनही बाहेर पडेल. भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही खेळणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड येण्याची शक्यता आहे. जो मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांच्यासोबत तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून काम करेल.
ऑस्ट्रेलियाने २०१८ पासून अॅशेस ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. तर इंग्लंडने २०११ पासून ऑस्ट्रेलियन भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. यावेळी इंग्लंड त्यांचा दुष्काळ संपवून विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे