विशाखापट्टणम, 8 ऑक्टोबर (हिं.स.) हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. लीग स्टेजच्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांनी ८८ धावांनी पराभव केला. टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि त्यांचा विजयी सिलसिला सुरू ठेवण्याचा प्रयत्न करेल. पण भारतासमोर काही अडचणी देखिल आहेत. स्मृती मानधनाच्या धावांचा अभाव संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंता निर्माण करणार आहे. दरम्यान, पहिला सामना गमावलेल्या दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध सहज विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले आहे.
भारताने मागील दोन्ही सामने जिंकले असले तरी, स्मृती मानधन, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या धावांचा अभाव चिंतेचा विषय आहे. श्रीलंकेविरुद्ध तिघेही अपयशी ठरले. त्यानंतर हरलीन देओल, अमनजोत कौर, रिचा घोष आणि दीप्ती शर्मा यांनी संघाला अडचणीतून वाचवले.
श्रीलंकेविरुद्ध १२४ धावांत भारताने सहा विकेट्स गमावल्या आणि पाकिस्तानविरुद्ध १५९ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. तळाच्या फळीतील फलंदाजांच्या योगदानाशिवाय भारताची परिस्थिती आणखी वाईट झाली असती. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी चूक करुन चालणार नाही. आणि आघाडीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
दुसरीकडे, गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यांना हे देखील विचारात घ्यावे लागेल की ही खेळपट्टी गुवाहाटी किंवा कोलंबोसारखी नाही. दीप्ती शर्माने आतापर्यंत सहा विकेट्स घेतल्या आहेत, तिला सहकारी फिरकीपटू स्नेह राणा आणि श्री चरणी यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. वेगवान गोलंदाज क्रांती गौड देखील प्रभावी ठरली आहे. आजारपणामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात न खेळणारी वेगवान गोलंदाजी अष्टपैलू अमनजोत कौरची तंदुरुस्ती देखील तपासली जाईल. जर ती तंदुरुस्त असेल तर ती रेणुका सिंग ठाकूरची जागा संघात घेऊ शकते.
शतकवीर ताजमिन ब्रिट्झ आणि विश्वासार्ह सुने लुस यांच्यासोबत, कर्णधार लॉरा वोल्वार्ड, मारियान कॅप आणि एलेके बॉश यांच्याकडूनही चांगली कामगिरी अपेक्षित आहे. गोलंदाजीमध्ये, नॉनकू म्हालाबा, अयाबोंगा खाका, कॅप, मसाबता क्लास आणि क्लो ट्रायॉन यांचे आव्हान भारतीय फंलदाजांना पार करावे लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे