अकोला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
जि. प. व पं. स. निर्वाचक गणाच्या आरक्षण सोडतीसाठी 13 ऑक्टोबरला सभा संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहेत.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या जागांच्या आरक्षणाची पद्धत व चक्रानुक्रम नियमानुसार जागा निश्चित करण्यासाठी ही सोडत सभा होईल. याबाबतचे प्रकटन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी निर्गमित केले आहे. त्यानुसार जि. प. निवडणूक विभागासाठी सोडतीची सभा दि. १३ ऑक्टोबरला सकाळी ११ वा. अकोला येथे नियोजनभवनात होणार आहे.
अकोट पं. स. आरक्षण सोडत अकोट तहसील कार्यालयात, बाळापूर पं. स. सोडत बाळापूर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात, मूर्तिजापूर पं. स. सोडत मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरातील शासकीय धान्य गोदामात, तसेच अकोला पं. स. आरक्षण सोडत अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सभागृहात होणार आहे. या सर्व सभा दि. १३ ऑक्टोबरला स. ११ वा. होतील.
त्याचप्रमाणे, तेल्हारा पं. स. आरक्षण सोडत तेल्हारा तहसील कार्यालयात, बार्शिटाकळी येथील सोडत तेथील पं. स. सभागृहात व पातूर पं. स. सोडत तेथील नविन तहसील कार्यालयात होईल. या तीन ठिकाणी सभा दि. १३ ऑक्टोबरला दु. ३ वा. होतील.
सभेद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यातील महिला आरक्षण, सर्वसाधारण महिला आरक्षण आदींसाठी सोडत काढण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे