परभणी : गंगाखेड रोडवर दुसरे बस स्थानक उभारण्याची मागणी
परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान व माजी आ. विजयराव गव्हाणे यांनी परभणी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि बसस्थानक परिसरातील असुविधा लक्षात घेऊन गंगाखेड रोडवर दुसरे बस स्थानक उभारण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी परिवहन
गंगाखेड रोडवर दुसरे बस स्थानक उभारण्याची मागणी


परभणी, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यसभा सदस्य डॉ. फौजिया खान व माजी आ. विजयराव गव्हाणे यांनी परभणी शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि बसस्थानक परिसरातील असुविधा लक्षात घेऊन गंगाखेड रोडवर दुसरे बस स्थानक उभारण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सविस्तर पत्र पाठवून तत्काळ निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, परभणी शहरात सध्या केवळ एकच एसटी बस स्थानक आहे. संभाजीनगर, लातूर, जिंतूर, पाथरी आदी भागातून येणाऱ्या सर्व बसेस याच स्थानकात येतात. त्यामुळे उड्डाण पुलाजवळ आणि मुख्य रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी, गोंधळ आणि अपघातांच्या घटना घडत आहेत. दररोज सुमारे १५०० हून अधिक बसेस या बसस्थानकात दाखल होत असल्याने प्रवासी, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. गंगाखेड रोडवरील विभागीय एसटी महामंडळाच्या जागेवर दुसरे बस स्थानक उभारल्यास गंगाखेड, पाथरी, लातूर आणि जिंतूर आगारातील बससेवा थेट त्या ठिकाणी थांबवता येईल. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या बसेसची संख्या सुमारे ८०० ने कमी होईल, ज्यामुळे वाहतूक कोंडीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण येईल. दुसरे बस स्थानक झाल्यास शहरातील ऑटोस्टँडवरील गर्दी, लहान व्यापाऱ्यांची गैरसोय आणि पोलीस प्रशासनावरचा ताण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. “या निर्णयामुळे परभणीकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळेल आणि शहराचा विकास अधिक शिस्तबद्धपणे होईल,” असे पत्रात म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande