परभणी, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। शेतकऱ्यांना पिकविम्याची योग्य आणि वेळेत नुकसान भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पिकविमा कंपनीने समन्वयाने कामे करावे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पिक कापणीचे प्रयोग होतील याचे नियोजन करावे. सर्व महसूल, कृषी, ग्रामविकास आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी समन्वयाने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काम करण्याचे निर्देश पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात परभणी जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप व निधी मागणी आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री श्रीमती बोर्डीकर बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे आदींसह महसूल, कृषि, ग्रामविकास विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपनीचे अधिकारी /प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीची मिळालेली रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. मागील वर्षी शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात त्रास झाला. यावेळेस एकही तक्रार शेतकऱ्यांची येणार नाही याची काळजी विमा कंपनीने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच नदीकाठच्या गावातील शेतातील विहिरीमध्ये साचलेल्या गाळाच्या बाबतही पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
प्रारंभी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यातील ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसानीच्या अनुदान वाटपाबाबतची माहिती आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या पंचनामे आणि निधी मागणीच्या बाबत करण्यात आलेली कार्यवाही याबाबतची सविस्तर माहिती दिली.
चव्हाण म्हणाले की, ऑगस्ट महिण्यात नुकसानीपोटी मिळालेले अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. तसेच माहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्या शेतकऱ्यांच्या ई-केवासीसाठी सेतु सुविधा केंद्र सकाळी आणि सायंकाळी जास्त वेळ चालू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis