अतिवृष्टी, दाट धुके व परतीच्या पावसामुळे कांदा पिकाची वाढ खुंटली; शेतकरी औषधफवारणीत गुंतला
येवला, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकरी पारंपरिकरित्या नगदी पीक म्हणून पोळ व लाल कांदा लागवडीला प्राधान्य देतात. मात्र यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे लागवड केलेले कांदा रोपे ७० ते ८० टक्के नष्ट झाली आहेत. केवळ ५ ते १० टक्के कांदा पिक टिकून असून आता दाट धुके व आर्द्र हवामानामुळे कांदा पिकावर मावा आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी कांद्याची पात जळू लागली असून पिक पिवळे पडून वाढ खुंटली आहे.
रोग आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बुरशीनाशके व पोषक तत्वांची फवारणी करत आहेत. मात्र तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव न मिळाल्याने या हंगामात चांगला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती.
गेल्या काही वर्षांत नित्कृष्ट कांदा बियाण्यांचा अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांनी यंदा घरगुती तसेच दर्जेदार कंपनीचे बियाणे वापरण्यास प्राधान्य दिले. अनेकांनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडून बियाणे घेऊन रोपे तयार केली; मात्र परतीच्या पावसाने त्यांचाही मोठ्या प्रमाणात नाश केला. त्यानंतर पुन्हा एकदा रोपे तयार करून लागवड करण्यात आली.
कांदा लागवडीत खत व मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले असून बाहेरील गावांहून महिला मजूर आणून लागवड केली जात आहे. अशा परिस्थितीत आता उरलेल्या १० टक्के कांदा पिकावर दाट धुके व रोगांचा तडाखा बसत आहे.
दररोजच्या पहाटे पडणाऱ्या धुक्यामुळे कांदा पात जळण्याचे व पिक पिवळे पडण्याचे प्रमाण वाढले आहे. परतीच्या पावसामुळे आर्द्रता टिकून राहत असल्याने रोगांचा प्रसार वाढत आहे. या सर्व संकटात कांदा पिकाचे रक्षण कसे करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
चौकट -1
लाल कांदा पीक हे आमचे एकमेव नगदी पीक आहे, पण आता जुगारी खेळ झाला आहे.भाव मिळेल या आशेवर पुन्हा लागण केली आहे.अतिवृष्टी नंतर आता धुई पसरत आहे.महागडी औषधे फवारून देखील हातात काय राहील याची चिंता सतावते आहे.:- संपत आहेर, कांदा उत्पादक शेतकरी, रेंडाळा, ता. येवला.
चौकट -2
धुक्यामुळे कांदा पिकावर गंभीर परिणाम होऊ शकतो — विशेषतः बुरशीजन्य रोग, फुलकिडे (thrips) व कांदा डाऊनी मिल्ड्यू सारखे रोग वाढतात. खाली धुक्यापासून कांद्याचे संरक्षण करण्यासाठी उपाय
धुक्यामुळे वाढलेला ओलावापाणी सकाळी देऊ नका, ड्रिप वापराडाऊनी मिल्ड्यू / ब्लाइटMetalaxyl + Mancozeb 0.25% फवारणीकीड / फुलकिडेनीम अर्क 5 किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 SL (0.3 ml/L)जैव नियंत्रणTrichoderma @ 5g/L मातीमध्ये मिसळवावेजमिनीमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी व्यवस्था करणे व बुरशीनाशकाचा वापर करावा.......
सुधाकर आहेर, कांदा पिक व्यवस्थापन तज्ञ
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV