जालना, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कठीण परिश्रमाशिवाय ते शक्य नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा, कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सातत्याने केलेला प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळेच यशाच्या शिखरावर पोहोचता येते. तरी कठोर परिश्रम आणि कौशल्य हाच यशाचा खरा मंत्र आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना मध्ये उद्योग-संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार अर्जुनराव खोतकर, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अतुल केसकर, प्राचार्य रजनी शेळके, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष पंकज काष्टीवर, मराठवाडा लघु उद्योग भारतीचे उपाध्यक्ष अविनाश देशपांडे, नरसिंह ट्रेडर्सचे गणेश पवार, संस्था व्यवस्थापक समिती विठ्ठल पवार, श्री काळे, सुधीर कापसे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, बदलत्या औद्योगिक युगात तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करण्याचे आणि कौशल्य विकासावर भर देणे आवश्यक आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगार व उद्योजकतेसाठी संधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही केले.
आमदार अर्जुनराव खोतकर म्हणाले की, सद्यस्थितीत जागतिक स्तरावर आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर विद्यार्थ्यांनी अभ्यास करतानी करायला हवा. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बळकटीकरणासाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. ज्यामुळे आगामी काळात जे विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना निश्चितच रोजगार निर्मितीची संधी मिळेल. याठिकाणी आज मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय या ठिकाणी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या वतीने अल्पकालीन रोजगारक्षम कार्यक्रम यामध्ये उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ सोहळा पार पडला, याचे थेट प्रक्षेपण उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरीक व अभ्यागतांना दाखविण्यात आले. या कार्यक्रमास अधिकारी-कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis