जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.) ठाणे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे यांनी आज सकाळी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर घुगे यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेतला. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अनुभवी अधिकारी असलेले रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्ह्यात ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याण योजनांच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हा अनुभव जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आज सकाळी औपचारिकरित्या पदभार स्वीकारल्यानंतर रोहन घुगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट घेऊन सध्याच्या प्रकल्प आणि योजनांवर चर्चा केली. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, अशी आशा नागरिक आणि प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर