जळगाव, 9 ऑक्टोबर (हिं.स.) खान्देशातील भूमीतून विविध क्षेत्रातील प्रतिभावंत निर्माण झाले आहेत त्यांना प्रेरणा मानून युवारंगाद्वारे प्राप्त झालेल्या संधीच सोनं विद्यार्थ्यांनी करावं असे प्रतिपादन करून आजच्या तरूणपिढीने राष्ट्र सर्वप्रथम ही भूमिका अंगीकारावी व आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान देशाप्रती समर्पित करावे असे आवाहन करीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरींग व मॅनेजमेंट (स्वायत्त), जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाचे उद्घाटन करतांना राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही एल माहेश्वरी, विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्र. कुलगुरू प्रा. एस. टी इंगळे, स्वागताध्यक्ष राजेंद्र नन्नवरे, युवारंग चे कार्याध्यक्ष नितीन झाल्टे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य अॅड अमोल पाटील, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. महेंद्रसिंग रघुवंशी, प्रा. एस.एस. राजपूत, प्रा. जगदीश पाटील, प्रा. सुरेखा पालवे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, संचालिका डॉ.प्रिती अग्रवाल, वित्त व लेखाधिकारी सीए रवींद्र पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, स्वप्नाली महाजन, प्रा. संदीप नेरकर, प्रा. मंदा गावीत, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे व डॉ. संजय शेखावत, डॉ. संजय पाटील, डॉ. विवेकानंद चव्हाण (जिल्हा समन्वयक) आणि सर्व माजी विद्यार्थी विकास संचालक उपस्थित होते.
यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, खान्देशाच्या भूमीतून भास्काराचार्य, साने गुरूजी, शिरीष कुमार, बालकवी ठोंबरे, लता मंगेशकर, भालचंद्र नेमाडे, अभिनेत्री स्मिता पाटील, कवि ना.धो. महानोर, प्रतिभाताई पाटील, उद्योजक भंवरलाल जैन, शितल महाजन इ. त्या त्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी आपली क्षमता सिध्द करून खान्देशाला नावलौकीक प्राप्त करून दिला आहे. या व्यक्तींच्या कार्याची प्रेरणा घेवून विद्यार्थ्यांनी नावलौकीक मिळवावा. आजच्या तरूणाईने व्यसनाधिनतेला स्पष्टपणे नकार देवून उत्कृष्ट सुसंस्कारीत नागरीक प्राप्त झालेल्या शिक्षणाच्या आधारे बनावे. एका क्षेत्रात सातत्य ठेवून त्यामध्ये सर्वोच्चस्थानी पोहचण्याचा प्रयत्न करावा. मनामध्ये आत्मविश्वास ठेवावा. ज्ञान देशासाठी अर्पण करावे. प्रधानमंत्री मोदी व राज्याचे मुख्यमंत्री यांनी विविध योजना युवकांसाठी जाहीर केल्या आहेत त्याचा फायदा घ्यावा. आरोग्यम धनसंपदा या ब्रीदवाक्याला शिर्षक म्हणून समोर ठेवून व्यसनाधिनता ठेवू नये व राष्ट्राचे शिक्षीत व सुसंस्कृत नागरीक बनावे. या युवारंगाला २५ वर्षांची परंपरा आहे. त्यातून उत्कृष्ट कलावंत निर्माण झाले आहेत. विद्यापीठाने ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुसंस्कृत नागरीक बनविले आहे. ते त्या त्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. त्याचे श्रेय विद्यापीठाचे कुलगुरू व सर्व संबंधित घटकांचे आहे. या युवारंगात “वंदे मातरम १५०” संकल्पना केंद्रस्थानी ठेवण्यात आली आहे. वंदे मातरम या गीतातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीला दिशा देणाऱ्या क्रांतीची ज्वाला पेटविली गेली आणि राष्ट्रभक्तीच्या चेतनेला आकार मिळाला आहेृ. विद्यार्थ्यांनी या युवारंगाच्या संधीचा लाभ घेवून उत्कृष्ट कलावंत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठाला आपतकालीन मदत केंद्र व इतर समस्या सोडविण्यासाठी जे जे शक्य आहे ते ते करण्याचे आश्वासन दिले आणि या युवारंगात विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिंनींचा सहभाग लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांनी देखील स्वयंशिस्त बाळगत आपला सहभाग वाढवावा असे आवाहन करीत उद्घाटनाचे जल्लोषपूर्ण भाषण केले. स्वागताध्यक्ष राजू नन्नवरे यांनी विद्यापीठाच्या युवारंगाला थीम बेस करण्याचे गेल्या तीन वर्षापासून सुरु केले आहेत. राज्यात हा प्रयोग प्रथम आपल्या विद्यापीठाने सुरु केला त्याचे अनुकरण आता इतर विद्यापीठे करीत आहेत असे सांगून पहिल्या युवारंगात शिवराज्यभिषेक, दुसऱ्या युवारंगात अहिल्यादेवी होळकर आणि आता बकीमचंद्र चटोपाध्याय लिखीत वंदे मातरम या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने ही थीम देण्यात आली आहे. विद्यापीठाने चांगला नावलौकीक व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दिलेल्या योगदानामुळे एनआयआरएफ रँकींगमध्ये आपले ५१ ते १०० मधील स्थान कायम ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर