जळगाव, 9 ऑक्टोबर, (हिं.स.) - माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणत्याही कार्यालयाकडून माहिती मागवीत
असताना, आपल्याला ज्या विषयाची माहिती आवश्यक आहे तो विषय अर्जात व्यवस्थितपणे
लिहिणे, विषयानुसार कोणत्या कालावधीतील माहिती पाहिजे आहे. आदी बाबींचा अर्जात
उल्लेख करून जन माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज परिपूर्ण भरून सादर करणे आवश्यक
असते, अशी माहिती, राज्य माहिती आयोग, नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र
गुरव यांनी दिली.
“माहिती अधिकार कायदा-२००५” या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत
भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना
श्री.गुरव बोलत होते. यावेळी राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे उपसचिव चंद्रकांत
कातकाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आर.एस.लोखंडे, उपजिल्हाधिकारी
निवडणुक अर्चना मोरे, भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य माहिती आयुक्त श्री.गुरव पुढे म्हणाले की, माहितीचा अधिकार कायदा अंमलात येऊन
वीस वर्षे पूर्ण होत आहे. माहितीचा अधिकार हा कायद्याने नियंत्रित केलेला असून भारताच्या
प्रत्येक नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार उपलब्ध आहे. कोणत्याही पदावर असलेल्या
व्यक्तीला माहिती मागता येत नसून फक्त व्यक्ती म्हणून माहिती मागता येते. कलम सहा अन्वये
माहिती मागताना फक्त विनंती करता येते. माहिती अधिकाराचा अर्ज करताना, नमुना
अर्जातील सर्व मुद्द्यांची माहिती अर्जदार भरणे आवश्यक असून अर्जाच्या बंद लिफाफ्यावर
माहितीचा अधिकार अर्ज असे नमूद केले गेले पाहिजे. तसेच जन माहिती अधिकारी यांच्याकडे
आपला अर्ज पोहोचला आहे का याची खात्री अर्जदाराने करणे आवश्यक आहे.
प्रथम अपील अर्ज करताना, अर्जामध्ये माहितीचे कारण लिहिणे आवश्यक आहे. प्रपत्र ‘क”
नुसार आयोगाकडे द्वितीय अपील करतांना काय काळजी घेतली पाहिजे, जनमाहिती अधिकारी
आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्ज हाताळतांना काय काळजी
घ्यावी, अर्ज कसा करावा याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. माहितीचा
अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जनमाहिती अधिकारी व प्रथम
अपीलिय अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी श्री.गुरव यांनी माहिती अधिकारासंबधी माहिती अधिकाराचा अर्ज करतांना काय
काळजी घ्यावी, या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या शेवटी जनमाहिती अधिकारी व
माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या विविध प्रश्नाचे निरसण त्यांनी केले. या चर्चासत्राला
शासनाच्या विविध विभागाचे जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी, माहिती
अधिकार कार्यकर्ते, समान्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भुसंपादन अधिकारी
निवृत्ती गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर