नांदेड, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)।महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या ७२ तासांच्या संपाच्या नोटीसनुसार ९ ऑक्टोबर पासून संप सुरु आहे. संपकाळात वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिमंडल स्तरावरुन पर्याप्त उपाययोजना करण्यात आल्याने नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र सुरळीत वीज पुरवठा सुरु ठेवला जात आहे. संपकाळात गुरुवारी दुपारपर्यंतच्या माहीतीनुसार ३१०० वीज कर्मचाऱ्यांपैकी सात कामगार संघटनांचे बी आणि जनरल शिफ्टमधील सुमारे ६५० वीज कर्मचारी संपावर होते. सरासरी २० टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत.
वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी उपविभाग, विभाग, मंडल आणि परिमंडल स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करुन तिथे तिनही शिफ्टमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नियंत्रण कक्षातून शाखा स्तरावरून वेळोवेळी अहवाल घेऊन योग्य त्या सुचना देण्यात आल्याने संपामुळे वीज पुरवठ्यावर कुठेही विपरित परिणाम झालेला नाही. मंडल आणि परिमंडलासह सर्व स्तरावरुन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
सध्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती आहे. त्यातून सावरण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा युध्दपातळीवर कार्यरत आहेत. दिवाळी सण तोंडावर आहे. या पार्श्वभूमीवर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आपापल्या कार्यालयामध्ये विनाविलंब रुजू होण्याचे आवाहन वरिष्ठ व्यवस्थापनाने केले आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. विजेअभावी नागरिकांची गेरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम अर्थात, मेस्मा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार संप बेकायदेशीर असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संपकाळात सुरळीत वीज पुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीज तारा, केबल्स, वीजखांब, फिडरपिलर्स, वितरणपेठ्या, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामग्री विविध कार्यालयामध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे.
संपकाळात वीजसेवा देणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. शिवाय, वीजपुरवठ्या संदर्भात काही तक्रार असल्यास नांदेड जिल्ह्यासाठी ७८७५४७३९८०, परभणीसाठी ७८७५४७६३२६ तर हिंगोली जिल्ह्यासाठी ७८७५४४७१४३ या क्रमांकावरुन डीएसएस कंट्रोल रुम शिवाय १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis