- सर्व ओबीसी बांधवांनी महामोर्चाला उपस्थित राहावे - वडेट्टीवार
नागपूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.) – येथे विदर्भातील सकल ओबीसी संघटनांचा आज महामोर्चा निघणार आहे. या महामोर्चाच्या संदर्भात राज्याच्या कानाकोपऱ्यातील गाव खेड्यांमध्ये तथा जिल्हा पातळीवर ओबीसी संघटनांच्या वतीने बैठका घेण्यात आल्या असून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. २ सप्टेंबर रोजी सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीच्या न्याय हक्कासाठी सर्व ओबीसी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
ओबीसी महामोर्चा संदर्भात बोलताना ओबीसी नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा मोर्चा म्हणजे केवळ आंदोलन नाही तर हा जनतेच्या भावनांचा उद्रेक आहे. ओबीसी समाजाच्या हक्क व आरक्षणा बाबतीत सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी जो शासन निर्णय काढलेला आहे तो अन्यायकारक आहे. या अन्यायाविरोधात एकजुटीने उभं राहणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे विदर्भातील विविध भागातून प्रतिसाद मिळत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
या मोर्चा संदर्भात पूर्वतयारी म्हणून सकल ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींमार्फत राज्याच्या कानाकोपऱ्यातील गाव, खेडी, शहर व जिल्हा पातळीवर विशेष बैठकांचे आयोजन याआधी करण्यात आले होते. नागपुरात आज ओबीसींचे पिवळे वादळ येणार आहे. संपूर्ण नागपूर शहरात लाखोंचा जनसागर उसळणार असून सरकारने दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला शासन निर्णय रद्द केल्याशिवाय ओबीसी बांधव आता हटणार नाही अशी माहिती ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. ओबीसी समाजाला डावलण्याचा शासनाचा हा कटकारस्थानी डाव समूळ उखडून फेकण्याकरिता सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, अस वडेट्टीवर म्हणाले.
मोर्चाची सुरुवात यशवंत स्टेडियम येथून दुपारी १२ वाजता होणार असून संविधान चौक येथे समारोपाची सभा होणार आहे. या सभेला विदर्भातील ओबीसी संघटनांतील अभ्यासक, मान्यवर उपस्थित राहणार असून, समस्त ओबीसी बांधवांनी होऊ घातलेल्या विशाल ओबीसी महामोर्चात शिस्तबद्ध आणि शांततेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी