मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। गोकुळ दुध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील आणि शिंदे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह त्यांच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, प्रदेश प्रवक्ते मुकेश गांधी, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
राजकीयदृष्ट्या सतर्क असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील दिग्गज लोकांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी किमया केली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक केले.
रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूतपणे उभी राहणार आहे.
हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात उभी करण्याचे आश्वासन आपण दिलात त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पुरोगामी विचारांचा... सहकारात अग्रगण्य स्थान असलेला... काबाडकष्ट करणार्या शेतकर्यांचा...हा कोल्हापूर जिल्हा आहे असे सांगतानाच हा जिल्हा लवकरच राष्ट्रवादीमय होईल असा विश्वास व्यक्त केला.
कोल्हापूरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची शपथ घेतली आहे - हसन मुश्रीफ
कोल्हापूर जिल्ह्यात कधीकाळी पाच आमदार आणि दोन खासदार होते आता फक्त दोन आहोत पण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला हेच गतवैभव मिळवून देण्याची शपथ आम्ही घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील असा शब्द वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि कोल्हापूरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी दिला.
कोल्हापूरातील दिग्गज व्यक्तींच्या पक्षप्रवेशामुळे हत्तीचे बळ आले आहे असे विधान हसन मुश्रीफ यांनी मागील पक्षप्रवेशाच्यावेळी केले होते मात्र एका वर्तमानपत्रातील 'कुजबुज' सदरात 'अशा किती हत्तींचे बळ मुश्रीफ पेलणार' असा सवाल उपस्थित केला होता. तो किस्सा सांगतानाच यावेळी ते वाक्य वापरणार नाही पण आज रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांच्या प्रवेशामुळे 'जेसीबी' आणि 'बुलडोझर' चे बळ आले आहे असा शब्दप्रयोग करुन हसन मुश्रीफ यांनी त्या शब्दांवर कोटी करत जोरदार हंशा मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्या लोकांचा पक्षात योग्य तो मानसन्मान राखला जाईल असा शब्दही हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर