रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे उल्लेखनीय कलाकार, खेळाडूंचा विशेष सन्मान
रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कलाकार, खेळाडूंमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. अशाच प्रकारे कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे उल्लेखनीय कलाकार, खेळाडूंचा विशेष सन्मान


रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : कला, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या कलाकार, खेळाडूंमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. अशाच प्रकारे कोकणाचे नाव देशात उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले. कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई सभागृहात रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे उल्लेखनीय कलाकार, खेळाडूंच्या विशेष सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष मानस देसाई यांच्यासमवेत सत्कारमूर्ती उपस्थित होते. संगीत रंगभूमी सेवा सहयोग पुरस्काराचे मानकरी, प्रसिद्ध ऑर्गनवादक विलास हर्षे, संगीत अलंकार परीक्षेत तबलावादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी अथर्व आठल्ये, संगीत अलंकार परीक्षेत पखवाज वादनात संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे मानकरी प्रथमेश तारळकर आणि जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण करणारे प्रसाद देवस्थळी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा देऊन हा सन्मान श्री. हिर्लेकर यांनी केला. सत्काराला उत्तर देताना हर्षे म्हणाले की, मी यापूर्वी डोंबिवलीत होतो. गेली १५ वर्षे रत्नागिरीत वास्तव्याला आहे. रत्नागिरी ही कलाकारांची नगरी असल्याने येथेच स्थायिक झालो. मायबाप रसिक श्रोत्यांनी मला उत्स्फूर्तपणे स्वीकारले म्हणूनच कलाकार राहिलो. लौकिक शिक्षण झाले नाही तरी सर्व गुरुंच्या साथीमुळेच ही वाटचाल शक्य झाली. अथर्व म्हणाला, शिपोशी, काटवली येथे पारंपरिक उत्सवात तबल्याची आवड निर्माण झाली आणि कलेला वाव मिळाला. आज जो काही आहे तो गुरू हेरंब जोगळेकर, विश्वनाथ शिरोडकर, प्रवीण करकरे यांच्यामुळेच. प्रथमेश म्हणाला की, माझा खूप मोठा सांगीतिक परिवार आहे. गुरुजी परशुराम गुरव यांनी ज्या तळमळीने मला पखवाज शिकवला, त्यांना मानाचा मुजरा. ते एसटीनेच प्रवास करतात, पण आडिवऱ्यात आल्यावर दोन किमी चालत शिकवण्यासाठी येत होते. अनेकांच्या सहकार्य, प्रोत्साहन, प्रेरणेमुळेच हा टप्पा गाठू शकलो आहे. मी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी. त्यामुळे आज घरच्यांकडून झालेल्या सत्काराने मी भारावलो आहे. कोकणात कलाकार मंडळी खूप आहेत. आता धावपटू व सायकलपटू घडवण्यासाठी व मॅरेथॉन, सायक्लोथॉनच्या माध्यमातून कोकणात क्रीडा पर्यटनाला गती देण्याचे काम करतो. जगातली पहिलीच मराठी भाषेसाठी होणारी ४ जानेवारी २०२६ रोजीच्या अर्धमॅरेथॉनमध्ये आपण सर्वांनी भाग घ्या, असे आवाहन प्रसाद देवस्थळी यांनी केले. या कार्यक्रमानंतर प्रसिद्ध गायक अजिंक्य पोंक्षे यांच्या गायनाची मैफिल रंगली. त्यांना हार्मोनियमसाथ चैतन्य पटवर्धन व तबलासाथ अथर्व आठल्ये, पखवाजसाथ प्रथमेश तारळकर यांनी केली. कार्यक्रमाला कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या सदस्यांसह रत्नागिरीतील संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. सौ. श्रद्धा पुरोहित-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मानस देसाई यांनी आभार मानले. कार्यकारिणी सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande