रायगड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। “देशात सध्या जात, पात आणि धर्माच्या नावाने जनतेत फूट पाडण्याचे राजकारण सुरू आहे. सत्तेसाठी धर्माचे राजकारण केले जात आहे, पण त्याने जनतेचे भले होणार आहे का?” असा थेट सवाल प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपस्थित केला. जातिवादातून बाहेर पडून आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
राज्यातील शेतकरी, मच्छीमार, मेंढपाळ, दिव्यांग अशा वंचित घटकांच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी बच्चू कडू यांनी “हक्क यात्रा” सुरू केली असून, या यात्रेच्या निमित्ताने ते गुरुवारी (दि. ९) अलिबाग येथे दाखल झाले. या वेळी त्यांच्या हस्ते प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा कार्यालय उद्घाटित करण्यात आले.
कडू म्हणाले, “आजचे राजकारणी शिवाजी महाराजांच्या विचारांपासून दूर गेले आहेत. त्यांनी जनतेसाठी रक्त सांडवले, पण आज सत्ताधारी फक्त जात-पात आणि धर्माच्या आधारावर सत्ता मिळवतात. विधानभवनात दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, कारण आमदारांना मतदारांपेक्षा पक्षाचे आदेश महत्त्वाचे वाटतात.” ते पुढे म्हणाले, “सरकार सध्या भावांना लुटा आणि लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये द्या, असे धोरण राबवतेय. जनतेने अशा दिखाऊ योजनांपासून सावध राहून हक्कांसाठी उभे राहिले पाहिजे.”
या वेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे यांनी पक्ष जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी, मच्छीमार, दिव्यांग आणि महिला उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर महिलांनी लेझीम नृत्य करत बच्चू कडू यांचे स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके