अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या आपल्या तरूण मुलाला त्याच्या आईने प्रियकराच्या मदतीने जीवे मारल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी सकाळी आसेगाव शेतशिवारात घडली. याप्रकरणात दत्तापूर पोलिसांनी तपासचक्राला गती देत चार मारेकऱ्यांना अटक करण्यात यश मिळविले.
गणेश उर्फ शुभम गजानन वारंगणे (वय २६, रा. नारगावंडी), असे मृताचे नाव आहे. दत्तापूर येथील मनोज कीर्तन, मृताची आई दुर्गा गजानन वारंगणे, अमोल सुरेश अर्जुने (रा. जुना दत्तापूर) व अशोक उर्फ चिवडा व्यकंटराव चवरे (वय ६५, रा. नारगावंडी), अशी अटक आरोपींची नावे आहेत. गणेश उर्फ शुभम वारंगणे याची आई दुर्गा हिचे मनोज कीर्तने याच्यासोबत प्रेमसंबध होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण गणेशला लागली होती. त्यामुळे तो त्याच्या आईला हटकत होता. मुलगा गणेश हा आपल्या प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने मनोज कीर्तन व दुर्गाने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी अमोल अर्जुन व अशोक उर्फ चिवडा व्यकंटराव चवरे यांना मदतीला घेतले. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ठरल्याप्रमाणे मनोज कीर्तन याने गणेश उर्फ शुभम याला आपल्या दुचाकीवर बसवून आसेगाव शेत शिवारातील शीतल गुप्ता यांच्या शेतात नेले. तिथे सर्वांनी मिळून गणेश उर्फ शुभम याचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला गंभीर अवस्थेत धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच डॉ. आकाश येंडे यांनी याबाबतची माहिती दत्तापूर पोलिसाना दिली.
पोलिसांनी सुरूवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. परंतु तपासानंतर ही हत्या असल्याची माहिती पोलिसाना मिळाल्याने दत्तापूर पोलिसानी तपासचक्राला गती दिली. हत्येचा गुन्हा दाखल करून अवघ्या २४ तासात चारही आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.
याकारवाईत दत्तापूरचे पोलीस निरीक्षक गिरीश ताथोड, सहायक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक चव्हाण, पोलीस कर्मचारी अतूल पाटील, हरिहर वैद्य, दीपक पंधरे, सागर कदम, नवनाथ खेडकर, पवन हजारे, किरण पवार, निलीमा खडसे, मयुर ढवक, पीयूष चौबे यांचा समावेश होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी