रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पनवेल येथे गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट ही उद्योजक घडविणारी संस्था असून, गेल्या १९ महिन्यांपासून विविध प्रशिक्षण शिबिरे, उद्योग मेळावे आणि मार्गदर्शन उपक्रमांद्वारे नवउद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. या प्रयत्नांमधून अनेक उद्योजक समाजात यशस्वीपणे उदयास येत आहेत.
या उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून उद्योजकांना आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना एका छताखाली आवश्यक गृहपयोगी वस्तू मिळाव्यात या हेतूने भव्य प्रदर्शन व विक्री दालन आयोजित करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दिनांक ११ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, वैश्य समाज हॉल, वाणी आळी, मिरची गल्ली, पनवेल येथे सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत होणार आहे. या ठिकाणी विविध उद्योजक आपल्या उत्पादनांचे स्टॉल्स उभारून विक्रीसाठी ठेवणार आहेत.
दिवाळी खरेदीसाठी ही सुवर्णसंधी ठरणार असून, मुंबई-पनवेल परिसरातील नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व विश्वस्त संतोषजी कामेरकर यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी