रायगड बोर्ली गावात हंडा मोर्चातून आक्रोश”
रायगड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या थेंबासाठी तहानलेले बोर्ली गाव आज खरोखरच अस्वस्थ झाले. उन्हाच्या कडक तापात हातात रिकामे हंडे घेऊन महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मारत आपला आक्रोश व्यक्त केला. “आम्हाला पाणी हवे, आश
“थेंबथेंब पाण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ; बोर्ली गावात हंडा मोर्चातून आक्रोश”


रायगड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।गेल्या काही महिन्यांपासून पाण्याच्या थेंबासाठी तहानलेले बोर्ली गाव आज खरोखरच अस्वस्थ झाले. उन्हाच्या कडक तापात हातात रिकामे हंडे घेऊन महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मारत आपला आक्रोश व्यक्त केला. “आम्हाला पाणी हवे, आश्वासन नाही!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.

ग्रुप ग्रामपंचायत बोर्ली हद्दीतील बोर्ली गावात पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळे नागरिकांना दररोज दीड ते दोन किलोमीटर अंतरावर नदी–नाल्यांमधून पाणी आणावे लागते. लहान मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी मातांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. या संघर्षाने महिलांचे आरोग्य बिघडले असून गावात मानसिक थकवा निर्माण झाला आहे.

या परिस्थितीचा निषेध करण्यासाठी गुरुवारी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. मात्र, या वेळी सरपंच आणि ग्रामसेवक दोघेही अनुपस्थित होते. सरपंचांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष भेट घेण्यास टाळाटाळ केली, यामुळे ग्रामस्थांचा संताप शिगेला पोहोचला.

ग्रामस्थांचा आरोप आहे की दरवर्षी सरकारकडून पाणीपुरवठा योजनांसाठी निधी येतो, पण तो केवळ कागदोपत्री दाखवला जातो. प्रत्यक्षात गावात कोणतेच काम होत नाही. त्यामुळे आजही गावातील स्त्रिया व वृद्धांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.“थेंबासाठी रडावं लागतंय, ही आमच्यासाठी लाजिरवाणी वेळ आहे,” असे एका ग्रामस्थ महिलेनं भावुकपणे सांगितलं. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची आणि निधीच्या वापराबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande