लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
लातूर वनविभाग, लातूर जिल्हा जैवविविधता समिती व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्यावतीने वन्यजीव सप्ताहानिमित्त लातूर येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्राच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संतुलन व जैवविविधता रक्षण यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
विभागीय वनाधिकारी जे. एन. येडलावार, सहाय्यक वनरक्षक रागुल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव सप्ताह साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमाडंट पारसनाथ होते. वनपरिक्षेत्र अधिकारी धनंजय पोटे, सहाय्यक कमांडंट विशाल कोरे, प्रशांतकुमार रॉय, जैवविविधता समिती सदस्य शहाजी पवार वनपरीमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, सर्पमित्र नेताजी जाधव, बालाजी पाटील, महेश पवार, जी.एच घुले आदिंची उपस्थिती होती.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पोटे यांनी वन्यजीव सप्ताह व वनकायद्याबाबत अभ्यासपूर्ण माहिती दिली. एखाद्या वन्यजीवास मारण्याचा विचार व त्यासाठी केलेली कृती हाही गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी वने व वन्यजीव रक्षणाची अनिवार्यता सांगितली. शहाजी पवार यांनी वसुंधरा रक्षणात झाडे आणि वन्यजीवांचे महत्व यावर माहिती दिली. सर्पमित्र नेताजी जाधव यांनी सापांबद्दल शास्त्रोक्त माहिती देत सापांबाबतचे गैरसमज दूर करावेत, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात कमाडंट पारसनाथ यांनी जैवविविधता रक्षणात झाडे आणि वन्यजीवांची भूमिका सांगितली. सीआरपीएफच्या वतीने त्यांच्या परिसरात हजारो झाडांचे संवर्धन केल्याने ही अनुकुलता विविध पक्षांसह वन्यजीवांच्या अधिवासासाठी जमेची ठरल्याचे सांगत वसुंधरा रक्षणासाठी आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन सहाय्यक कमांडंट विशाल कोरे यांनी केले. आभार सहाय्यक कमांडंट प्रशांतकुमार रॉय यांनी मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis