
मुंबई, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। प्रसिद्ध डिझाइन प्लॅटफॉर्म कॅनव्हानं एआयच्या मदतीनं डिझाइन आणि मार्केटिंग जगात क्रांती घडवून आणली आहे. कंपनीनं जगातील पहिलं डिझाइन-केंद्रित एआय मॉडेल विकसित केलं असून, त्यावर आधारित नव्या डिजिटल मार्केटिंग आणि व्हिडिओ एडिटिंग साधनांची घोषणा केली आहे. या सर्व बदलांचा समावेश कंपनीच्या ‘क्रिएटिव्ह ऑपरेटिंग सिस्टम’मध्ये करण्यात आला असून, हे पारंपरिक ऑपरेटिंग सिस्टम नसून विविध एआय टूल्स, टास्क-स्पेसिफिक साधने आणि इंटरफेस यांचा एकत्रित संच आहे.
कॅनव्हाचे सहसंस्थापक कॅमरॉन अॅडम्स यांनी सांगितलं की, “हे केवळ अॅप्लिकेशन लेयर नसून संपूर्ण क्रिएटिव्ह प्रक्रिया चालवणारे एक खरे ऑपरेटिंग सिस्टम आहे.” या नव्या बदलांमुळे वापरकर्त्यांना अधिक सहज आणि प्रभावी अनुभव मिळणार आहे, विशेषतः मार्केटिंग टीम्ससाठी. या अद्ययावत सुविधांमुळं कॅनव्हानं गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या वर्कप्लेस अॅप्सना मजबूत पर्याय दिला आहे. मात्र, या प्रीमियम सबस्क्रिप्शन फीचर्समुळे काही वापरकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
कॅनव्हानं त्याचा व्हिडिओ एडिटर पूर्णपणे नव्याने डिझाइन केला आहे, ज्यामुळं अनुभवी एडिटर्सशिवायही वापरकर्ते सहजपणे एडिटिंग करू शकतात. नव्या टेम्पलेट लायब्ररी, सुलभ टाइमलाइन आणि स्मार्ट लेयरिंग फीचर्समुळे फुटेज ट्रिमिंग आणि सिंकिंग आणखी सोपं झालं आहे. याशिवाय ‘फॉर्म्स’ हे नवीन टूल गुगल फॉर्म्ससारखं असून, फीडबॅक गोळा करून तो थेट कॅनव्हा शीट्समध्ये ऑटोमॅटिक इम्पोर्ट करण्याची सुविधा देते.
मार्केटिंग क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करत कॅनव्हानं ‘कॅनव्हा ग्रो’ हे नवं मार्केटिंग प्लॅटफॉर्म सादर केलं आहे. याच्या मदतीनं वापरकर्ते एआयच्या साहाय्याने जाहिराती डिझाइन करू शकतात, कॅम्पेन्स लॉंच करू शकतात आणि त्यांचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकतात. हे एआय प्रत्येक कॅम्पेनच्या डेटामधून शिकतं आणि पुढील प्रयत्न अधिक स्मार्ट आणि परिणामकारक बनवते. ‘ईमेल डिझाइन’ प्रोडक्टमुळं कोडिंगशिवाय ब्रँडेड ईमेल कॅम्पेन्स तयार करून थेट एक्सपोर्ट करण्याचीही सुविधा उपलब्ध झाली आहे.
हे सर्व नवीन फिचर्स कॅनव्हाच्या इन-हाऊस विकसित केलेल्या विशेष एआय मॉडेलवर आधारित आहेत, जे डिझाइनच्या गुंतागुंतीच्या समस्यांना समजून घेण्यासाठी प्रशिक्षित आहे. कंपनीच्या मते, या एआय इंटिग्रेशनमुळे डिझाइन प्रक्रिया अधिक वेगवान आणि स्मूथ झाली आहे.
कॅनव्हा सध्या वेब-बेस्ड ग्राफिक डिझाइन प्लॅटफॉर्ममधून विकसित होऊन एकात्मिक ‘वर्कप्लेस सोल्यूशन’च्या दिशेनं वाटचाल करत आहे. कंपनीचा उद्देश गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या दिग्गजांना पर्याय निर्माण करण्याचा असून, सर्व क्रिएटिव्ह आणि मार्केटिंग टूल्स एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याचा आहे. सबस्क्रिप्शनच्या दरांबाबत सध्या कोणताही वाढीचा निर्णय नसल्याचं अॅडम्स यांनी स्पष्ट केलं आहे.
या सर्व नव्या उपक्रमांमुळे कॅनव्हा ‘क्रिएटिव्ह ऑपरेटिंग सिस्टम’ म्हणून स्वतःची मजबूत ओळख निर्माण करत आहे. यामुळे डिझाइन आणि मार्केटिंग प्रक्रिया अधिक एकात्मिक, सोपी आणि परिणामकारक होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांसाठी ही एआय क्रांती मोठी संधी ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule