
केपटाउन, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या जी20 शिखर परिषदेचा बहिष्कार जाहीर केला आहे. ट्रम्प यांनी आरोप केला की दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या (आफ्रिकान) शेतकऱ्यांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे कोणताही अमेरिकी अधिकारी या परिषदेत सहभागी होणार नाही. यानंतर अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील राजनैतिक तणाव वाढला असून दक्षिण आफ्रिकेची सरकार आणि सत्तारूढ पक्ष आफ्रिकन नॅशनल कॉंग्रेस (एएनसी) यांनी ट्रम्प यांच्या या आरोपांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. एएनसीचे महासचिव फिकिले मबालुला यांनी ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या विधानांना खोटे आणि साम्राज्यवादी हस्तक्षेप असल्याचे म्हटले.
मबालुला म्हणाले कि, दक्षिण आफ्रिकेत वंशविद्वेष (रॅसिझम) नाही, उलट येथे समानता सुनिश्चित करण्यासाठी कायदे केले गेले आहेत. पूढे त्यांनी स्पष्ट केले की,अमेरिकेने सहभाग न घेतासुद्धा जी20 परिषद नियोजित वेळेतच जोहान्सबर्ग येथे होईल. त्यांनी म्हटले, “आम्ही परिषद यशस्वीपणे पार पाडू — अमेरिका आली किंवा नाही. आमचा देश लोकशाहीप्रधान आहे आणि आम्ही कोणत्याही महासत्तेच्या दबावाखाली झुकणार नाही.”
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र मंत्री रोनाल्ड लामोला यांनी ट्रम्प यांचे आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले. त्यांनी पोलिसांच्या आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, शेतांवरील गुन्ह्यांमध्ये काळे आणि गोरे दोन्ही समुदाय प्रभावित झाले आहेत.
अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील आधीच ताणलेले व्यापारी संबंध आणखी बिघडू शकतात. ट्रम्प यांनी आधीच दक्षिण आफ्रिकन उत्पादनांवर जादा आयातशुल्क (टॅरिफ) लादले आहेत आणि काही गोऱ्या शेतकऱ्यांना राजकीय आश्रय देण्याची ऑफरही दिली आहे.
अशा परिस्थितीत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, अमेरिकेशी जवळीक असलेले काही देश ट्रम्प यांच्या समर्थनार्थ परिषदेतून माघार घेऊ शकतात. जी20 शिखर परिषद दोन आठवड्यांनंतर जोहान्सबर्ग येथे होणार आहे, ज्यात जगभरातील अनेक शीर्ष नेते सहभागी होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode