
२०२६ साठी भारताचा कोटा १,७५,०२५ निश्चित
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांनी सौदी अरेबियातील जेद्दा येथे 2026 साठीच्या द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारानुसार भारताचा हज कोटा 1,75,025 यात्रेकरूंकरिता निश्चित करण्यात आला आहे.
रिजिजू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “भारत-सौदी अरेबिया संबंधांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल. हज 2026 साठी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. भारतीय यात्रेकरूंसाठी 1,75,025 हज कोटा निश्चित करण्यात आला आहे. दोन्ही देशांची सामायिक बांधिलकी अशी आहे की सर्व हज यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित आणि सुलभ होईल.”
रिजिजू 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी सौदी अरेबियाचे हज आणि उमरा मंत्री डॉ. तौफीक बिन फावजान अल-राबियाह यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी हजशी संबंधित तयारीचे परीक्षण केले आणि यात्रेकरूंकरिता प्रवास, निवास आणि आरोग्य सुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याबाबत चर्चा केली. अधिकृत निवेदनानुसार, बैठकीनंतर भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात हज 2026 साठी द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी करण्यात आली. दोन्ही देशांनी भारतीय यात्रेकरूंना सुरक्षित, सुलभ आणि आध्यात्मिक अनुभव देण्याचा संकल्प केला.किरण रिजिजू यांनी जेद्दा आणि ताइफ येथील हज आणि उमरा संबंधित सुविधांची पाहणी केली, ज्यामध्ये जेद्दा विमानतळावरील टर्मिनल-1 आणि हरमाइन स्टेशनचा समावेश आहे. त्यांनी भारतीय मिशन तसेच जेद्दा आणि रियाध येथील दूतावासातील अधिकाऱ्यांशीही भेट घेतली आणि त्यांच्या तयारीचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode