
बंगळुरू, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। बंगळुरू विमानतळावर काही लोकांनी नमाज अदा करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. कर्नाटक भाजपने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत काँग्रेस सरकारवर पक्षपाताचा आरोप केला आहे. भाजपचे प्रवक्ते विजय प्रसाद यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’ वर पोस्ट करत विचारले की, टर्मिनल २ सारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रात अशा धार्मिक कृतीस परवानगी कशी देण्यात आली? त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कॅबिनेट मंत्री प्रियांक खरगे यांना थेट प्रश्न केला की, त्यांनी या कृतीला मान्यता दिली का?
प्रसाद म्हणाले की, नमाज पठण करणाऱ्या व्यक्तींनी विमानतळ प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतली होती का, याची चौकशी व्हावी. “जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परवानगी घेऊन पथसंचलन काढतो तेव्हा सरकार त्यावर आक्षेप घेते, पण विमानतळासारख्या संवेदनशील परिसरात अशा कृतींकडे सरकार डोळेझाक करते. हे गंभीर सुरक्षा उल्लंघन नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या आरोपांवर राज्य सरकारने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule