
मनिला, 10 नोव्हेंबर (हिं.स.) फिलिपिन्समध्ये आलेल्या प्रबळ ‘फंग-वोंग’ वादळाने देशाच्या उत्तरे-पश्चिम भागात प्रचंड विध्वंस घडवला आहे. जोरदार वारे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत पूर आणि भूस्खलन झाले असून, किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि १४ लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, हे वादळ आता उत्तर-पश्चिम दिशेने तैवानकडे सरकत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व कॅटानडुआनेस प्रांतात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला, तर सामार प्रांतात एका महिलेचा घर कोसळल्यामुळे मृत्यू झाला. उत्तरेकडील नुएवा विजकाया या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनात दोन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पालकांसह आणखी एक मूल जखमी झाले आहे.
सुमारे 1,000 घरे नुकसानग्रस्त झाली असून 132 हून अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. पाणी अचानक वाढल्याने अनेक लोक घरांच्या छतांवर अडकून राहिले. 185 किमी प्रति तास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि मुसळधार पावसामुळे अनेक प्रांतांमध्ये वीजपुरवठा ठप्प झाला आहे. 325 देशांतर्गत आणि 61 आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, तर सुमारे 6,600 लोक बंदरांवर अडकले कारण कोस्ट गार्डने जहाजांना समुद्रात जाण्यास बंदी घातली.
फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी नुकत्याच आलेल्या टायफून कल्मैगीमुळे झालेल्या हानी आणि आता फंग-वोंगच्या परिणामांचा विचार करून आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. सरकारकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून शाळा आणि सरकारी कार्यालये दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode