
लखनऊ , 10 नोव्हेंबर (हिं.स.)।उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर येथे सोमवारी झालेल्या एकता पदयात्रेदरम्यान मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री योगी म्हणाले की, आता उत्तर प्रदेशातील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताचे नियमित आणि अनिवार्य गायन केले जाईल.
गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘एकता यात्रा’ आणि ‘वंदे मातरम्’ या सामूहिक गायन कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी भारतरत्न, लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीच्या समारंभानिमित्त एकता पदयात्रेचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, हा उपक्रम नागरिकांमध्ये भारत माता आणि मातृभूमीप्रती श्रद्धा आणि अभिमानाची भावना जागवेल. त्यांनी म्हटले, “राष्ट्रीय गीत वंदे मातरमप्रती आदराची भावना असली पाहिजे. आम्ही उत्तर प्रदेशातील प्रत्येक शाळा आणि शैक्षणिक संस्थेत याचे गायन अनिवार्य करू.”
त्यांनी सांगितले की, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भारताची झोपलेली चेतना जागृत केली त्या राष्ट्रीय गीत वंदे मातरमचा आजही काही लोक विरोध करत आहेत. त्यांनी सांगितले की, कोणताही व्यक्ती, मत किंवा धर्म राष्ट्रापेक्षा मोठा असू शकत नाही. जो व्यक्ती श्रद्धा किंवा राष्ट्राच्या मार्गात अडथळा आणतो, त्याला बाजूला ठेवले पाहिजे. काही लोकांसाठी आजही त्यांचे वैयक्तिक मत आणि धर्म मोठे आहे.
मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे म्हणाले की, जात, प्रदेश आणि भाषेच्या नावाखाली समाजाला विभाजित करणाऱ्या घटकांची ओळख पटवणे हे आपले कर्तव्य आहे. हे घटक म्हणजे नव्या ‘जिन्ना’ना जन्म देण्याच्या कटाचा भाग आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, “आपल्याला हे सुनिश्चित करावे लागेल की भारतात पुन्हा कधीही कोणताही नवा जिन्ना निर्माण होऊ नये; अशा विभाजनकारी विचारांना मुळ धरू देण्याआधीच संपवले पाहिजे.”
--------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode