
नवी दिल्ली, १० नोव्हेंबर (हिं.स.) बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले आहे की, यावेळी बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. सत्तेत आल्यानंतर, बिहारसाठी महाआघाडीचा 5 वर्षांसाठीची २० कलमी योजनांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, महिलांना २,५०० रुपये मासिक मदत आणि २०० युनिटपर्यंत मोफत वीज यांचा समावेश असणार आहे.
काँग्रेस नेते रमेश यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाआघाडीच्या हमीमध्ये ५०० रुपयांना गॅस सिलेंडर, महिलांसाठी मोफत बस सेवा, जीविका दीदींना ३०,००० रुपये वेतन, वृद्धांना १,५०० रुपये पेन्शन आणि अपंगांना ३,००० रुपये मासिक पेन्शन यांचा समावेश आहे. शिवाय, त्यात शेतकऱ्यांना हमी आधारभूत किंमत, २४ तास मोफत वीज आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणे यांचा समावेश आहे. जयराम रमेश यांनी सांगितले की, महाआघाडी सरकार संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांवरून वाढवून देणारा कायदा समाविष्ट करणार आहे. अनुसूचित जाती आणि जमातींच्या अत्याचाराच्या खटल्यांची जलद सुनावणी करण्यासाठी विशेष न्यायालये देखील स्थापन केली जातील. सहारामध्ये अडकलेले पैसे वसूल करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जाईल असे त्यांनी सांगितले. पत्रकारांना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था आणि मोफत वैद्यकीय उपचार दिले जातील आणि वकिलांना जीवन आणि आरोग्य विमा प्रदान केला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे