
पाटणा, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 20 जिल्यांतील 122 विधानसभा जागांवर मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी एकूण 45,339 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी 4,109 केंद्रांना संवेदनशील घोषित करण्यात आले आहे, तर 4,003 केंद्रांना अतिसंवेदनशील म्हणून ओळखण्यात आले आहे. या केंद्रांवर मतदान संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होणार आहे.
राज्यातील कटोरिया, बेलहर, चैनपूर, चेनारी, गोह, नवीनगर, कुटुंबा, औरंगाबाद, रफीगंज, गुरुआ, शेरघाटी, इमामगंज, बाराचट्टी (36 केंद्रे), बोधगया (200 केंद्रे), रजौली, गोविंदपूर, सिकंदरा, जमुई, झाझा आणि चकाई या विधानसभा क्षेत्रांतील केंद्रांवर दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल.तर बोधगयातील 106 केंद्रांवर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होईल. या सर्व केंद्रांवर पुरेशा संख्येने सुरक्षा दल तैनात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दुसऱ्या टप्प्यात 1302 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी 1165 पुरुष, 136 महिला आणि एक थर्ड जेंडर उमेदवार आहे. या टप्प्यात 3 कोटी 70 लाख मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी 1 कोटी 95 लाख पुरुष, 1 कोटी 74 लाख महिला, 4 लाख 4 हजार दिव्यांग मतदार, 63,373 सेवा मतदार, 943 थर्ड जेंडर मतदार आणि 43 एनआरआय मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातील 7 लाख 69 हजार 356 नवमतदारही मतदानासाठी पात्र आहेत.
अंतिम टप्प्यात राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधनाचे (एनडीए) 122 आणि महागठबंधनाचे 126 उमेदवार मैदानात आहेत. यात भाजपचे 53, जद(यू)चे 44, लोजपा-रामविलासचे 15, राष्ट्रीय लोक मोर्चाचे 4 आणि हम पक्षाचे 6 उमेदवार आहेत. तर राजदचे 70, काँग्रेसचे 37, व्हीआयपीचे 8, सीपीआयचे 4, सीपीआय (एमएल) चे 6 आणि सीपीआयचे 1 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. याशिवाय जनसुराज पक्षाचे 120 उमेदवारही स्पर्धेत आहेत.या टप्प्यात माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद, रेणु देवी, मंत्री विजेंद्र यादव, नीतीश मिश्रा, प्रेम कुमार, कृष्णनंदन पासवान, प्रमोद कुमार, शीला मंडल, लेशी सिंह, जयंत राज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेश राम, लोजपा (रामविलास) प्रदेशाध्यक्ष राजू तिवारी, राजद नेते उदय नारायण चौधरी, रालोमो प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता, काँग्रेसचे आमदार दलनेते शकील अहमद खान आणि भाकपा (माले) आमदार दलनेते महबूब आलम अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न या टप्प्यातील मतदानात दावणीवर लागला आहे.
बिहारचे डीजीपी विनय कुमार यांनी सांगितले की, दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या तयारी पहिल्या टप्प्यापेक्षा अधिक कडक करण्यात आल्या आहेत. ज्या जिल्यांमध्ये मतदान होणार आहे, त्यापैकी काही जिल्हे भारत-नेपाळ सीमेजवळ आहेत. तसेच काही जिल्हे आंतरराज्यीय सीमेवर आहेत. या राज्यांसाठी नोडल अधिकारी नेमले गेले असून, त्या राज्यांच्या डीजीपींसोबत चर्चा देखील झाली आहे.”
सुरक्षेची माहिती देताना डीजीपी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय सीमा काल सील करण्यात आली असून, आंतरराज्यीय सीमा आज सील केली जाईल. सीमावर्ती राज्यांमध्ये तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत आणि संयुक्त तपासणी केली जाईल. या टप्प्यात 1,650 कंपन्या तैनात केल्या जात आहेत. याशिवाय, ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे, तिथे राज्य पोलिस दलही तैनात असेल.-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी