
इस्लामाबाबद , 13 नोव्हेंबर (हिं.स.)।पाकिस्तानच्या नॅशनल बुधवारी (दि.१२) तीव्र गदारोळाच्या वातावरणात देशाच्या २७व्या घटनादुरुस्ती विधेयकाला दोन-तृतीयांश बहुमताने मंजुरी दिली. या विधेयकात देशात ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’या नवीन पदाची निर्मिती, फिल्ड मार्शलला आजीवन पदावर कायम ठेवण्याचा अधिकार, तसेच संवैधानिक न्यायालय स्थापन करण्याचे तरतुदी आहेत.या विधेयकाच्या मंजुरीनंतर फिल्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या अधिकारात लक्षणीय वाढ झाली असून, आता ते आजीवन फिल्ड मार्शल म्हणून राहतील. मात्र, सध्या या विधेयकावर राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे; त्यांच्या स्वाक्षरीनंतरच हे कायद्यात रूपांतरित होईल.
कायदा मंत्री आझम नझीर तारड यांनी हे विधेयक मंगळवारी नॅशनल असेंब्लीमध्ये सादर केले होते, ज्याला एक दिवस आधीच सिनेटकडून मंजुरी मिळाली होती. बुधवारी असेंब्लीतील विरोधकांच्या बहिष्काराच्या वातावरणात विधेयकाच्या सर्व ५९ कलमांना मंजुरी देण्यात आली. मतदानादरम्यान २३४ मते विधेयकाच्या बाजूने, तर फक्त ४ मते विरोधात पडली.
माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाचे — पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) — खासदारांनी विरोध दर्शवित विधेयकाच्या प्रती फाडल्या आणि त्या पंतप्रधानांच्या आसनाकडे फेकल्या. सत्रादरम्यान पंतप्रधान शहबाज शरीफ, माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि बिलावल भुट्टो-झरदारी उपस्थित होते. कायदा मंत्री तारड यांनी या दुरुस्तीला “विकसनशील आणि विचारपूर्वक घटनात्मक सुधारणा प्रक्रिया” असे संबोधले. विरोधी आघाडी तेहरीक तहफ्फुज-ए-आईन-ए-पाकिस्तान (टीटीएपी) ने या दुरुस्तीविरुद्ध राष्ट्रव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र संसद भवनाबाहेर कोणताही मोठा विरोध दिसून आला नाही.
या विधेयकानुसार, राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने आर्मी चीफ आणि चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस यांची नियुक्ती करतील. जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे पद २७ नोव्हेंबर २०२५ रोजी रद्द करण्यात येईल. आर्मी चीफ, जो आता चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस देखील असेल, तो पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांडच्या प्रमुखाची नियुक्ती करेल. विधेयकात हे स्पष्ट केले आहे की हा प्रमुख नेहमी पाकिस्तानच्या सैन्यातूनच असावा.
सरकारला आता सेना, हवाई दल आणि नौदलातील अधिकाऱ्यांना अनुक्रमे फिल्ड मार्शल, मार्शल ऑफ द एअर फोर्स आणि अॅडमिरल ऑफ द फ्लीट या सर्वोच्च पदांवर बढती देण्याचा अधिकार मिळेल. तसेच, फिल्ड मार्शलचा दर्जा आजीवन कायम राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode