
क्वेटा, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सामान्य नागरिकांच्या हत्या आणि बलोच नेत्यांच्या अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने प्रांतातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सुरक्षा अलर्टनंतर राजधानी क्वेटा वगळता संपूर्ण बलुचिस्तानमध्ये १६ नोव्हेंबरपर्यंत इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे.
बलुचिस्तान प्रांतिक गृह विभागाने १२ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अलर्टनुसार, मोबाइल इंटरनेट सेवा १६ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग N-70 च्या लोरलाई विभागात वाहनांच्या हालचालीवरही १४ नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा निर्णय प्रांतातील सुरक्षा स्थिती आणि वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. याशिवाय क्वेटाच्या कँटोनमेंट भागातील सर्व शाळा १६ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रांतातील सर्व ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद राहील, मात्र क्वेटा शहरात ही बंदी लागू केली जाणार नाही. तथापि, बुधवारी क्वेटातील अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी सेवांमध्ये अडचण येत असल्याची तक्रार केली. गृह विभागाने सर्व जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांना बंदी तात्काळ लागू करण्याचे तसेच नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.
बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बलोच आर्मी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे, तर प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सैन्यही बलोच नेते, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहे. १८ सप्टेंबर रोजी पाकिस्तानी सैन्याने बलुचिस्तानच्या जेहरी परिसरात हवाई हल्ला (एअर स्ट्राईक) केला होता, ज्यात तीन सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode