
ढाका, 13 नोव्हेंबर (हिं.स.)। बांग्लादेशच्या विशेष न्यायालय ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील निकाल १७ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगने बंदचे आवाहन केले आहे. या बंदमुळे राजधानी ढाका येथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण बांग्लादेश हाय अलर्टवर ठेवण्यात आला आहे.अभियोक्ता पक्षाच्या एका सदस्याने सांगितले की, न्यायाधिकरण आपला निकाल ठरलेल्या वेळापत्रकानुसारच देईल.
आवामी लीगच्या बंद आणि शेख हसीना यांच्या विरोधातील निकालाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ढाका येथे सेना, बॉर्डर गार्ड बांग्लादेश आणि दंगारोधी पोलिसांची तैनाती केली आहे. ढाक्याच्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे, बससेवा मर्यादित प्रमाणात सुरू आहे. अनेक खासगी संस्था आणि विद्यापीठांनी आपले वर्ग ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.माध्यमांच्या वृत्तांनुसार, ढाका, मुंशीगंज, सेंट्रल तंगाईल आणि दक्षिण-पश्चिम गोपालगंज या भागांत अज्ञात व्यक्तींनी पाच रिकाम्या बसांना आग लावल्याची घटना घडली आहे.
शेख हसीना यांच्याविरोधातील मानवतेविरुद्ध गुन्ह्याच्या खटल्याचा निकाल १७ नोव्हेंबरला दिला जाणार आहे. अभियोक्ता पक्षाने शेख हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. शेख हसीना यांच्यासह या प्रकरणात माजी गृह मंत्री असदुज्जमान खान आणि माजी पोलिस प्रमुख अब्दुल्ला अल मनुन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोप आहे की, या लोकांनी गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थी आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला.याच विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि बांग्लादेश सोडून भारतात यावे लागले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode