
नाशिक, 15 नोव्हेंबर (हिं.स.)।
- महापालिका निवडणुकीसाठी नुकतीच प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यानंतर सर्वपक्षीय तयारीला लागले आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदेसेनेने स्वबळाच्या दिशेने पाऊल टाकल्याचे चित्र आहे. मनपा निवडणुकीसाठी सर्व ३१ प्रभागांतून इच्छुक उमेदवारांची नोंदणी प्रक्रिया केली जाणार आहे. भाजपच्या शंभर प्लसच्या नाऱ्यामुळे महायुती होणे शक्य नसल्याने शिंदेसेनेने स्वबळाची तयारी सुरू केल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सर्वच ३१ प्रभागांतील इच्छुक उमेदवारांकडून शिवसेनेतर्फे अर्ज नोंदणी करणार असून, मुलाखती आणि सर्वेक्षणाद्वारे अंतिम उमेदवारी निश्चित करणार असल्याची माहिती शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, संपर्कप्रमुख विलास शिंदे व महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. शिवसेनेतर्फे पत्रक जाहीर करत नाशिक महापालिका निवडणुकीत सर्वच ३१ प्रभागांतून इच्छुक उमेदवारांचे अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. शिवसेनेतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना शिवसेनेतर्फे अर्ज वाटप करण्यात येणार आहे. अर्जाद्वारे त्यांची माहिती जमा करण्यात येईल. इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती व पक्षातर्फे प्रत्येक प्रभागात सर्वेक्षण करण्यात येणार आहेत त्यानंतर अंतिम उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. मायको सर्कल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नोंदणी अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींना पक्षसदस्य नोंदणी आणि अर्ज नोंदणी अत्यावश्यक असल्याचे शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख बोरस्ते. संपर्कप्रमुख शिंदे व महानगरप्रमुख तिदमे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV