
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : सहकार सप्ताह निमित्त लहान लांजा येथे आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सोनाली कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून लांजा येथील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्य सहकारी संघ (पुणे), रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. वंजारे महाविद्यालयाच्या सहकार्याने कुणबी विकास सहकारी पतसंस्था (लांजा), राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था (रत्नागिरी), जनता नागरी सहकारी पतसंस्था (लांजा), लांजा नागरी सहकारी पतसंस्था (लांजा) व तक्षशिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था (पाली) यांनी या उपक्रमाला सहकार्य केले.
सहकार चळवळीतून ग्रामीण विकास या विषयावर आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयीन युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धकांनी ग्रामीण विकासासाठी सहकारी तत्त्वाचे महत्त्व आणि त्याची अंमलबजावणी यावर प्रभावीपणे आपले मनोगत व्यक्त केले. स्पर्धेचा गुणांक्रमे निकाल असा : सोनाली मंगेश कदम, अथर्व विवेक पाध्ये, नितू मानकचंद्र पवार, तन्वी चंद्रकांत सरफरे, गंधाली राजेंद्र कोळसुकर. रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डातर्फे विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. काशिनाथ चव्हाण व डॉ. सुनील साळवे यांनी काम पाहिले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंजारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण यांनी भूषविले. ते म्हणाले, आजच्या युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता, सहकारी तत्त्वावर संघटित झाले पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया, तसेच जांभूळ आणि करवंदे यांसारख्या स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यास प्रचंड वाव आहे. युवकांनी एकत्र येऊन हे उद्योग सुरू केल्यास त्यांचे भवितव्य नक्कीच उज्ज्वल होईल.
कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सुरेंद्र श्रीधर लाड, सीताराम लांबोरे, संचालिका सौ. स्मिता अनिल दळवी, कुणबी विकास नागरी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास दरडे, लांजा नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक चंद्रशेखर रुमडे, जनता नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्डाचे मुख्याधिकारी ए. आर. कळंत्रे यांनी केले. प्राध्यापक ऋषिकेश पाटील यांनी आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी