
रत्नागिरी, 15 नोव्हेंबर, (हिं. स.) : चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात रविवारी (दि. १६ नोव्हेंबर) सायंकाळी साडेचार वाजता, राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय प्रमुख सरस्वती (ताई) आपटे यांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.
एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण होणार आहे.
वाचनालयाने महनीय व्यक्तींच्या तैलचित्रांचे समृद्ध कलादालन उभारले आहे. देदीप्यमान कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या कोकणातील महनीय व्यक्तींची तैलचित्रे या कलादालनात आहेत. कोकणातील हे एकमेव कलादालन हे चिपळूण नगरीचे भूषण आहे. राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका ताई आपटे यांच्या तैलचित्राने कलादालनाच्या वैभवात भर पडणार आहे.
हे तैलचित्र ज्येष्ठ चित्रकार आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवी देव यांच्या कुंचल्यातून साकारले असून ते या समारंभाचे अध्यक्ष असणार आहेत. यावेळी पद्मश्री फाटक या ताई आपटे यांच्या जीवनावर भाष्य करणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी