
दोहा, 15 नोव्हेंबर (हिं.स.)14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इमर्जिंग आशिया कपमध्ये ३२ चेंडूत शतक झळकावले. भारत अ संघाकडून खेळताना त्याने यूएईविरुद्ध ४२ चेंडूत १४४ धावा केल्या. दोहा येथे भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ४ बाद २९७ धावा केल्या. यूएईला फक्त १४९ धावाच करता आल्या.
वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारत अ संघाने दुसऱ्या षटकात एक विकेट गमावली. प्रियांश आर्य ६ चेंडूत १० धावा काढल्यानंतर धावबाद झाला. नमन धीर तिसऱ्या क्रमांकावर आला. त्याने एका टोकाला धरून ठेवले, तर वैभवने दुसऱ्या टोकाला ३२ चेंडूत शतक झळकावले.
नमन १२ व्या षटकात ३४ धावा (२३ चेंडू) करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. नमन बाद झाल्यानंतर कर्णधार जितेश शर्माने जबाबदारी स्वीकारली, पण दुसऱ्या बाजूला वैभव १४४ धावांवर बाद झाला. त्याने आपल्या स्फोटक खेळीत ११ चौकार आणि १५ षटकार मारले.
भारताने १६ षटकांत ४ बाद २३५ धावा केल्या होत्या. नेहल वधेरा १४ धावांवर बाद झाला. कर्णधार जितेशने रमणदीप सिंगसह ३०० धावसंख्येच्या जवळ धावसंख्या गाठली. जितेशने ३२ चेंडूत ८३ धावा केल्या. रमणदीप ६ धावांवर नाबाद राहिला.
युएईकडून मोहम्मद फराजुद्दीन, अयान अफझल खान आणि मोहम्मद अरफान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मोहम्मद रोहिद, मोहम्मद अरफान आणि हर्षित कौशिक यांना विकेट मिळाली नाही.
वैभव सूर्यवंशी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विरुद्ध शतक झळकावल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याने वयाच्या १३ व्या वर्षी हे शतक झळकावले आणि तो अंडर-१९ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.
आयपीएल २०२५ च्या आधी झालेल्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभवला १.१० कोटी रुपयांना विकत घेतले. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याला खेळवण्यात आले नव्हते. पण कर्णधार संजू सॅमसन जखमी झाल्यानंतर त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी देण्यात आली. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर, त्याने गुजरातविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले.
तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिेकेटपटू ठरला. त्याने आता फक्त ३२ चेंडूत शतक झळकावले. टी२० क्रिकेटमधील हे त्याचे सर्वात जलद शतक आहे. भारताकडून उर्विल पटेल आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी २८ चेंडूत शतक झळकावले आहे. ऋषभ पंतनेही ३२ चेंडूत शतक झळकावले आहे. वैभवने आता भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विक्रमाची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, एस्टोनियाच्या साहिल चौहानने २७ चेंडूत शतक झळकावले आहे.
२९८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, फक्त यूएईच्या शोहेब खानला अर्धशतक झळकावता आले. त्याने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. मोहम्मद अरफानने २६, सय्यद हैदरने २० आणि मयंक कुमारने १८ धावा केल्या. इतर कोणताही खेळाडू ५ धावांचा टप्पाही ओलांडू शकला नाही. संघ ७ विकेट्स गमावून केवळ १४९ धावा करू शकला.
भारत अ संघाकडून गुर्जपनीत सिंगने १८ धावांत ३ बळी घेतले. डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबेने २ फलंदाजांना बाद केले. यश ठाकूर आणि रमनदीप सिंग यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. सुयश शर्मा, नमन धीर आणि नेहल वधेरा यांना एकही विकेट घेता आला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे