

- वारकरी महाअधिवेशनात निर्धार
पुणे, 15 नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांसमुक्त करावीत, तसेच मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रचारावर बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, यांसारख्या प्रमुख मागण्यांसह १९ व्या भव्य वारकरी महाअधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले. ‘वारी आळंदीची, राष्ट्र आणि धर्मरक्षणाची’ हे ब्रीदवाक्य घेऊन पार पडलेल्या या अधिवेशनात राज्यभरातील एक हजाराहून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने येथील सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठात कार्तिक वद्य एकादशीच्या निमित्ताने हे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. ‘वारकऱ्यांची श्रद्धास्थाने, देवता आणि संत यांच्यावर होणारे आघात’ या गंभीर विषयावर मंथन करण्यासाठी राज्यभरातील संत आणि वारकरी एकत्र आले होते.
या वेळी बोलताना प.पू. रामगिरी महाराज म्हणाले की , रामायणातील उदाहरणे विकृत पद्धतीने मांडून आदिवासींचे धर्मांतरण करण्याचे ख्रिस्ती मिशनऱ्यांचे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी २०० वर्षांपूर्वी चारी वर्णाच्या हिंदूंना एकत्र करण्याचे महान कार्य केले. आपणही आपापल्या प्रभावक्षेत्रात हे कार्य केले, तर धर्मांतरण रोखणे शक्य होईल.
ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे म्हणाले की , संत-महंतांनी संघटित होऊन संदेश देण्याची परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या काळापासून चालत आली आहे; पण आज आळंदीत आरोग्य आणि शिक्षण याचे महत्त्व सांगत ख्रिश्चन मिशनरी आळंदीतील हिंदूंचे धर्मांतरण करत आहेत. याला आपण आळा घातला पाहिजे.
या वेळी हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की , जादूटोणा कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेली; परंतु देव-धर्माची टीका करणारी महाराष्ट्र शासनाची ‘जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती, प्रचार व प्रसार समिती’ (PIMC) तात्काळ बरखास्त करण्यात यावी. तसेच नास्तिक आणि अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे काही लोक पंढरीच्या वारीमध्ये वारकऱ्यांचा बुद्धीभेद घडवून आणत आहेत; हे त्वरित थांबवले पाहिजे. राज्यातील हिंदुत्ववादी सरकारने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संत-महंतांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सरकारशी चर्चेसाठी एकत्र येण्याचे आवाहन श्री. घनवट यांनी केले.
रणरागिणी समितीच्या कु. क्रांती पेटकर यांनी लव्ह जिहादचे भयावह वास्तव मांडून कायदा करण्याची मागणी केली. ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करणे, इंद्रायणी नदीचे जलशुद्धीकरण करणे यासारख्या मागण्या शासनाकडे लावून धरण्याचे आश्वासन दिले.
अधिवेशनात संमत झालेले प्रमुख ठराव : महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांसमुक्त करून त्यांच्या पावित्र्याचे रक्षण करावे आणि मंदिर परिसरात अन्य धर्मियांच्या प्रसारावर बंदी घालावी. हिंदू युवतींच्या संरक्षणासाठी राज्यात 'लव्ह जिहाद विरोधी कायदा' तातडीने संमत करावा. हिंदूंची मंदिरे आणि भूमी बळकावणारा 'वक्फ कायदा' त्वरित रद्द करावा. इंद्रायणी आणि चंद्रभागा नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी. राज्यात गोवंश हत्याबंदी कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी करावी. पंढरीच्या वारीमध्ये नास्तिकतावादी व अर्बन नक्षलवाद्यांकडून होणारा बुद्धीभेद थांबवावा.
या अधिवेशनाला दंडी स्वामी अमृताश्रमानंद महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज, कै. मामासाहेब दांडेकर स्मृती प्रतिष्ठान, ह.भ.प. बापू महाराज रावकार, ह.भ.प. संग्राम बापू भंडारे हे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी