
रोम, 17 नोव्हेंबर (हिं.स.)इटलीच्या यानिक सिनरने एटीपी फायनल्सचे अजिंक्यपद पटकावले आहे. त्याने सलग दुसऱ्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची किमया साधली आहे. अंतिम सामन्यात सिनरने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कार्लोस अल्कारजचा ७-६, ७-५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
या हंगामात दोन्ही टेनिसपटूंमध्ये ही आणखी एक हाय-प्रोफाइल लढत होती. जी सिनरने जिंकली. यापूर्वी त्याने २०२५ च्या विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्कारजचा पराभव केला होता.
अंतिम फेरीनंतर सिनर म्हणाला, माझ्यासाठी हा एक अविश्वसनीय हंगाम होता. माझ्या इटालियन चाहत्यांसमोर अशा प्रकारे हंगाम संपवणे खूप खास वाटते.
या हंगामात दोन्ही टेनिसपटू तीन ग्रँडस्लॅम फायनलमध्ये एकमेकांसमोर आले. फ्रेंच ओपनमध्ये अल्कारजने पाचव्या सेटच्या टायब्रेकमध्ये विजय मिळवला. त्यानंतर सिनरने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत आपल्या विजयाचा बदला घेतला. पण अल्कारजने पुन्हा एकदा अमेरिकन ओपन फायनल जिंकली.
सिनरने या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनही जिंकले. २६ जानेवारी रोजी, मेलबर्नमधील रॉड लेव्हर अरेना येथे, त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हचा सरळ सेटमध्ये ६-३, ७-६ (७-४), ६-३ असा पराभव केला. हे त्याचे सलग दुसरे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद ठरले होते.
एटीपी फायनल्स ही वर्षातील सर्वात प्रतिष्ठित पुरुष टेनिस स्पर्धा आहे. हंगाम संपवणारी स्पर्धा म्हणूनही ही स्पर्धा ओळखली जाते. एटीपी रँकिंगमधील टॉप आठ एकेरी टेनिसपटू आणि टॉप आठ दुहेरी संघ यात भाग घेतात. ही स्पर्धा कोणत्याही ग्रँडस्लॅम नंतरची सर्वात मोठी मानली जाते कारण फक्त एलिट टेनिसपटू या स्पर्धेत आमने-सामने येतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे