राज्य शालेय खो-खो स्पर्धा - कोल्हापूर संघाला दुहेरी विजेतेपद, नाशिक आणि लातूर संघ उपविजयी
नाशिक, 17 नोव्हेंबर (हिं.स.)। - क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये १९ वर्षे मुले आणि मुली या वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आंतर विभागीय खो- खो स्पर्धेचे आयोजन नाशिकच्य
राज्य शालेय खो-खो स्पर्धा. कोल्हापूर संघाला दुहेरी विजेतेपद. नाशिक आणि लातूर संघ उपविजयी.


नाशिक, 17 नोव्हेंबर (हिं.स.)।

- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये १९ वर्षे मुले आणि मुली या वयोगटाच्या महाराष्ट्र राज्य आंतर विभागीय खो- खो स्पर्धेचे आयोजन नाशिकच्या मीनाताई ठाकरे, विभागीय क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. दिनांक १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित या स्पर्धेत मुलांध्ये आणि मुलींमध्ये कोल्हापूर विभागाच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून विजेतेपदावर आपले नांव कोरून दुहेरी मुकुट पटकाविला. मुलींमध्ये यजमान नाशिकच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तर मुलांमध्ये लातूर विभागाच्या संघाने उपविजेतेपद मिळविले.

मुलीच्या कोल्हापूर विरुद्ध नाशिक या अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाने सुरवातीपासून आक्रमक खेळ करून चांगली सुरवात केली. कोल्हापूरकडून खेळतांना सलोनी जामदार हीने बचावात दोन्हीही सत्रात १.३० मिनिटे आणि आक्रमणात दोन गाडी टिपले. अमृता पाटीलने बचावात अनुक्रमे २.०० आणि ३.०० मिनिटे बचाव करतांना तब्बल पाच गडी बाद करून अष्टपैलू खेळ करत आपल्या संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली.

नाशिक संघाकडून शुषमा चौधरी हीने अष्टपैलू खेळ करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जागृती जाधव हीनेही बचावात १.०० मिनिटे आणि ०.३० मिनिटे बचाव करून दोन गडी बाद करुन अष्टपैलू खेळांचे प्रदर्शन केले. तर रोहिणी भवर हीने बचावात दोन्हीही सत्रात एक-एक मिनिट सुंदर बचाव करत दोन गडीही टिपले. जागृती जाधव, जयश्री पवार, कविता माळघरे, ताई पवार यांनीही उत्कृष्ठ खेळ केला. परंतु त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

मुलांचा अंतीम सामना अत्यंत चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात ८-८ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रातही आठ मिनिटापर्यंत १६-१६ अशी बरोबरी होती. परंतु शेवटच्या मिनिटात कोल्हापूर संघाने एक गुण मिळवत हा अंतीम सामना १७-१६ अश्या अवघ्या एक गुणांच्या फरकाने जिंकत विजेतेपदाचा दुहेरी मुकुट आपल्या नावे केला. कोल्हापूर संघाकडून शरद घाडगे याने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून बचावामध्ये २.२० आणि ०.३० मिनिटे सुंदर बचाव करत तीन गडीही टिपले. उदय पडळकर याने बचावात १. १० आणि १. ४० मिनिटे तर आक्रमणात तीन गडी बॅड केले. राजू पाटील यानेही बचावात ०. ५० आणि १. ४० मिनिटे बचाव करत तीन गडी बॅड केले. लातूरच्या संघाकडून अजय वाल्हेकर, विशाल वसावे, किरण ढाकणे, नितेश वसावे , राज जाधव आणि हराध्य वसावे यांनी तोलामोलाचा खेळ करून आपल्या विजयाच्या अश्या पल्लवित ठेवल्या होत्या. परंतु शेवटच्या मिनिटात केवळ एक गुणाने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांक मिळविणाऱ्या संघांना प्रमुख पाहुणे नाशिक विभागाच्या क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंके, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे, खो-खो संघटक मंदार देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, भाऊसाहेब जाधव खो- खो आंतरराष्ट्रीय खेळाडू रेश्मा राठोड, प्रीती करवा, दिनेश अहिरे यांच्या हस्ते आकर्षक चषक, मेडल्स, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिके प्रदान करून गौरवण्यात आले. तर या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करणारे खेळाडू मुलींमध्ये उत्कृष्ट आक्रमक - सुषमा चौधरी, नाशिक, उत्कृष्ट संरक्षक - सानिका चाफे, कोल्हापूर, उत्कृष्ठ अष्टपैलू - अमृता पाटील, कोल्हापूर यांना तर मुलांमध्ये राजू पाटील कोल्हापूर, जितेंद्र वसावे लातूर आणि शरद घाडगे यांना अनुक्रमे उत्कृष्ट आक्रमक, उत्कृष्ट संरक्षक आणि उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून रोख पारितोषिके आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. -

नाशिक जिल्हा खो -खो असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम - यावेळी बोलतांना स्नेहल साळुंके यांनी सांगितले की शालेय स्पर्धामध्ये रोख पारितोषिके दिली जात नाही. मात्र नाशिक जिल्हा खो - खो असोसिएशन आणि क्रीडा प्रबोधीनी यांच्या वतीने विजेत्या पहिल्या तीन क्रमांकाच्या संघांना आणि उत्कृष्ट सहा खेळाडूंना रोख पारितोषिके देण्यात आली, हा स्तुत्य उपक्रम आहे असे सांगून खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. . खेळाडूंच्या कष्टाचे चीज व्हावे, त्यांना आणखी प्रोत्साहन मिळावे हा यामागील हेतू आहे असे प्रोयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आणि विविध विभागातून आलेल्या उत्कृष्ट खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये निवड केली जाणार आहे अशीही माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली .

या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशनचे प्रमुख मंदार देशमुख, उमेश आटवणे, राज्य खो-खो असोसिएशनचे पंच यांनी तांत्रिक जबाबदारी पार पडली. तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, भाऊसाहेब जाधव, या स्पर्धेच्या प्रमुख प्रीती करवा, उत्तरा खानापुरे, नेहा सोनार आणि सर्व सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

स्पर्धेचे निकाल :- मुली -

१) कोल्हापूर विभाग - विजेता संघ

२) नाशिक विभाग - उपविजेता संघ

३) लातूर विभाग - तृतिय क्रमांक.

मुले -

१) कोल्हापूर विभाग - विजेता संघ

२) लातूर विभाग - उपविजेता संघ

३) मुंबई विभाग - तृतिय क्रमांक.

उत्कृष्ट खेळाडू :-

*मुली* - १) सुषमा चौधरी, नाशिक - उत्कृष्ट आक्रमक खेळाडू.

२) सानिका चाफे, कोल्हापूर - उत्कृष्ट संरक्षक खेळाडू.

३) अमृता पाटील, कोल्हापूर - उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू.

मुले - १) राजू पाटील, कोल्हापूर - उत्कृष्ट आक्रमक खेळाडू.

२) जितेंद्र वसावे, लातूर - उत्कृष्ट संरक्षक खेळाडू.

३) शरद घाडगे, कोल्हापूर - उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande