
अमरावती, 18 नोव्हेंबर (हिं.स.) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी नुकतीच चांदूरबाजार तालुक्याला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, स्थानिक पंचायत समितीने सुरू केलेल्या दिव्यांग जागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला.
हा रथ ग्रामीण भागातील सर्व गावे आणि शाळांमध्ये जाऊन दिव्यांगांसह नागरिकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करेल. समाजात आजही दिव्यांगांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. तसेच, काही शालेय विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या अल्पशा दिव्यांगत्वाची जाणीव नसते, ज्यामुळे ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहतात. ही मोहीम याच उद्देशाने हाती घेण्यात आली आहे.
शासनाने दिव्यांगत्वाचे २१ प्रकार निश्चित केले आहेत. यामध्ये अंधत्व, अंशतः अंधत्व, कर्णबधिर, वाचा दोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षमता, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, अविकसित मांसपेशी, मज्जा संस्थेतील आजार, मल्टीपल स्क्लेरोसिस, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ॲसिड हल्लाग्रस्त पीडित आणि कंपवात रोग यांचा समावेश आहे.
या रथाचा मुख्य उद्देश या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे, दिव्यांगांचा शोध घेणे, त्यांना योग्य औषधोपचार, आवश्यक सुविधा आणि शासकीय मदत पोहोचवणे हा आहे.
याच भेटीदरम्यान, सीईओ महापात्रा यांच्या हस्ते राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. त्यांनी तालुक्यातील शिरजगाव बंड, बेलोरा आणि चिंचोली काळे या गावांना भेटी देऊन नागरिक, शाळा आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सातनवारी ग्रामपंचायतीप्रमाणे डिजिटल कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील २३ ग्रामपंचायती आता डिजिटल झाल्या आहेत.या संपूर्ण दिवसाच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत गट विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश घोगरकर, गट शिक्षण अधिकारी कुचे, पंचायत विस्तार अधिकारी रामेश्वर रामागडे, सुरेश लांडगे, बांधकाम अभियंता राजेश अडगोकार, निखिल नागे, राजकुमार वसुले, सरपंच भैय्यासाहेब कडू, अरुणा काळे, नंदा वाकोडे, उमेदचे सागर वानखेडे, सुभाष तांबे, अरविंद मून यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि गट साधन केंद्राच्या महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी